
श्री. तुळजाभवानी मंदिरात अनाधिकृत सिंहासन पुजा घालणाऱ्या पुजाऱ्याविरुध्द मंदिर संस्थानच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून मंदिरात पाच वर्षे प्रवेश बंदीची कारवाई करण्यात आली आहे.या गंभीर प्रकारणात सुरक्षा रक्षक कंपनीलाही एक लाखाचा दंड जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्री. तुळजाभवानी मातेच्या मुर्तीची जिझ होवू नये म्हणून पुरातत्व खात्याने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सिंहासन पुजा मर्यादीत करण्यात आल्या आहेत. श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थांन मार्फत सिंहासन पुजेसाठी ऑनलाइन पास प्रणाली सुरू असून दररोज सकाळी व सायंकाळी मिळून दहा सिंहासनांचे नियोजन करण्यात येते. मात्र, दि. २१ एप्रिल रोजी नियमानुसार पाच सिंहासन होणे अपेक्षित असताना सहा सिंहासन झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अतिरिक्त सिंहासन कशा आधारावर देण्यात आले, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.हे प्रकरण गंभीर असून श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने या प्रकरणात कारवाई करत संबंधीत पुजाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील पुजाऱ्याला पाच वर्षासाठी मंदिर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच मंदिरातील गंभीर प्रकार घडत असताना SISPL Security Company कडून वेळेवर माहिती न देणे ही मोठी निष्काळजीपणा ठरली आहे. या निष्काळजीपणाबद्दल कंपनीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सिंहासनासाठी निश्चित करण्यात आलेले ११०० रु.ऑनलाईन शुल्क पूर्णतः पारदर्शक पद्धतीनेच आकारलेले आहे, याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर घटनेच्या वेळी धार्मिक व्यवस्थापक म्हणून जबाबदारी नेमकी कोणाकडे होती, याची सखोल चौकशी सुरू असून सर्व बाबींची काटेकोर पडताळणी केली जात आहे. दोषी आढळणाऱ्यावर नियमांनुसार कठोर व तात्काळ कारवाई करण्यात येईल. – माया माने, तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन, श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान.


