
शिवाजी पार्कसाठी एकनाथ शिंदे गट घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव?
उद्धव ठाकरेंचा विजय शिवसेनेच्या शिवसैनिकांचे बळ वाढवणारा
मुंबई दि २३(प्रतिनिधी) – शिवसेना आणि शिंदे गटाने अत्यंत प्रतिष्ठेच्या बनवलेल्या दसरा मेळाव्यावर उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या बाजूने निर्णय देत ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. यावेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सदा सरवणकर आणि पालिकेचे सर्व आक्षेप फेटाळत धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांत एकापाठोपाठ एक राजकीय धक्के बसलेल्या शिवसेनेसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. यामुळे शिंदे गट स्वतः च्या जाळ्यात फसला आहे.
मुंबई महानगरपालिकेने कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत शिवसेना आणि शिंदे गट या दोघांचे शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठीचे परवानगी अर्ज फेटाळून लावले होते. त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात होता. शिवसेनेने २२ आॅगस्टला अर्ज करूनही परवानगी न दिल्याने महापालिकेच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त करत ठाकरेंना परवानगी दिली आहे. यामुळे ठाकरे गटात उत्साहाचे वातावरण आहे. पण आता शिंदे गट या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील करणार आहे.सोमवारी शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ठाकरेंचा हा आनंद कायम राहणार की निर्णय बदलला जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. पण शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याने शिंदे गट अजूनही मैदानासाठी लढणार असल्याचे संकेत दिले आहेत.
शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि दसरा मेळावा हे अनोखे समीकरण राहिलेले आहे. बरेच शिवसैनिक शिवाजी पार्कवर जो गट दसरा मेळावा घेणार त्याला समर्थन देणार हे स्पष्ट होते कारण बाळासाहेब दसरा मेळाव्यातच शिवसैनिकांना आदेश द्यायचे. ही परंपरा राहिली आहे. पण यंदा ही परंपरा खंडीत होण्याची शक्यता होती. पण अखेर शिवसेना विजयी झाल्यामुळे मूळचा शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबरच राहण्याची शक्यता आहे.