एकनाथ शिंदे गटाची अशीही ‘फेक’ फोटो खेळी
सुप्रिया सुळेंचा एडिटेड फोटो ट्विट करणा-या शिंदेसेनेचे पितळ उघडे
मुंबई दि २३(प्रतिनिधी) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीत बसून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे काम पाहत असल्याची छायाचित्रे सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचे दाखविणारा एक फोटो ट्वीट केला होता.
हा फोटो बघा.. कोण कोणाच्या खुर्चीवर बसलयं ?? pic.twitter.com/8UUb5VzMQR
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) September 23, 2022

या फोटोत राजेश टोपे आणि दिलीप वळसे पाटील हे दोघेही दिसत आहेत. हा फोटो ट्वीट करण्यामागे म्हात्रे यांचा हेतू श्रीकांत शिंदे यांच्यावरील टीकेचा रोख सुप्रिया सुळेंकडे जाईल असा होता. पण तो फोटो शिंदेसेनेने एडीट करुन वापरल्याचे स्पष्ट दिसुन येत होते.त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या शेजारील दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपेंचेही फोटो एडिट केल्याचे दिसून येत होते. ट्विटवर अनेकांनी हा फोटो एडिट केल्याचे सांगत म्हात्रे यांची खिल्ली उडवली आहे. सुप्रिया सुळे यांचा सोशल मिडियात प्रभावी वावर असतो. त्यांची छायाचित्रे देखील मोठ्या प्रमाणावर तेथे उपलब्ध आहेत. त्यातीलच एक छायाचित्र जसेच्या तसे उचलून एक एडिटेड फोटो तयार केल्याचे स्पष्ट दिसत होते. सुप्रिया सुळे यांचा जो फोटो यासाठी वापरला गेला आहे तो एका सार्वजनिक कार्यक्रमातील असून तो जसाच्या तसा घेण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांचा खुर्चीवर बसलेला एक फोटो राष्ट्रवादीने ट्विट केला होता. त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न शिंदे सेनेने केला खरा पण तो त्यांच्या अंगलट आला आहे. एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून वादात सापडत आले आहे. पण आता तर फेक फोटो एडिट करत स्वतः वाद ओढवून घेतला आहे.