
पुण्यातील नसरापूर आणि पर्वती भागातील अत्याचाराच्या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालेला असतानाच, आता मुळशी तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एका १४ वर्षीय विशेष (मतिमंद) मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आयस्क्रीम विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे मुळशी परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, पीडित १४ वर्षीय मुलगी दुपारी २ च्या सुमारास आपल्या लहान चुलत बहिणीसह घराबाहेर उभी होती. यावेळी दुचाकीवरून आयस्क्रीम विकण्यासाठी पिंटू शिवकुमार नावाचा विक्रेता तिथे आला. मुली आयस्क्रीम घेण्यासाठी त्याच्याजवळ गेल्या असता, आरोपीने पीडितेला आयस्क्रीम देण्याच्या बहाण्याने जवळ ओढून तिचा विनयभंग केला.पीडितेने तात्काळ आरडाओरडा केला आणि ती घरी धावत आली. तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला, मात्र ग्रामस्थांनी आणि पालकांनी त्याचा पाठलाग करून त्याला शोधून काढले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

आरोपीची माहिती आणि पोलीस कारवाई
आरोपी पिंटू शिवकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून सध्या मुळशीतील सूस परिसरात वास्तव्यास होता. पौड पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो (POCSO) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

फेरीवाल्यांच्या पडताळणीची मागणी
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी परप्रांतीय फेरीवाले, भंगारवाले आणि विक्रेत्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. अनेक विक्रेते महाराष्ट्रातील आरटीओ नंबर असलेल्या गाड्या वापरतात, त्यामुळे पोलिसांनी त्यांची कडक चौकशी करून अशा प्रवृत्तींना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे.

