Latest Marathi News
Ganesh J GIF

महिला आयोग अन् प्रदेशाध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार?; ‘या’ ६ नावांची जोरदार चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे राज्यसभेच्या रिक्त जागेवर कोण जाणार याची चर्चा रंगली असतानाच, दुसरीकडे पक्षातील गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या महत्त्वाच्या पदांवर वर्णी लावण्यासाठी नेत्यांनी ‘देवगिरी’वर फिल्डिंग लावली आहे.

सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी सध्या चार माजी खासदारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये आनंद परांजपे,सुबोध मोहिते, शिवाजीराव आढळराव पाटील, संजय काका पाटील (विधानसभेपूर्वी भाजपमधून आलेले) यांच्यासोबतच राष्ट्रवादीतील मातब्बर घराणी असलेल्या भुजबळ आणि मलिक कुटुंबीयांतूनही दावेदारी केली जात असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. तसेच, पार्थ पवार यांचा आग्रह असणारे अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांची नावेही या शर्यतीत आघाडीवर आहेत.

महिला आयोग आणि प्रदेशाध्यक्ष पदासाठी कोणाचं नाव चर्चेत?

रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेल्या महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी वैशाली नागवडे, रूपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांची नावे चर्चेत आहेत. महिला आयोगासाठी सामाजिक चळवळीतील प्रतिभा शिंदे, दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे आणि सुनेत्रा पवारांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष पदाचा तिढा कायम
गेल्या १० महिन्यांपासून राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष पद रिक्त आहे. सुरज चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर अद्याप या पदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही. दुसरीकडे, समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आता दीड-दोन वर्षे उलटली आहेत. मुंबई अध्यक्ष पदासाठी सध्याचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे आणि शिवाजीराव नलावडे यांच्यात चढाओढ पाहायला मिळत आहे.

‘पदांच्या गाठी देवगिरीवर’
“लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पण राष्ट्रवादीतील पदांच्या गाठी मात्र देवगिरीवर बांधल्या जातात,” अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. अनेक नेत्यांची शिष्टमंडळं सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेत आहेत. मात्र, अद्याप कोणालाही पक्षाकडून अधिकृत शब्द देण्यात आलेला नाही.आता या सर्व महत्त्वाच्या पदांवर कोणाची वर्णी लागते आणि ‘देवगिरी’वरून कोणाच्या नावाची अधिकृत घोषणा होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!