Latest Marathi News
Ganesh J GIF

भोसरीच्या उद्योजकाचे ५६ लाख अमेरिकेतून परत आणले !; पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी

सायबर भामट्यांनी सातासमुद्रापार पाठवलेले पैसे परत मिळवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मात्र, पिंपरी-चिंचवड सायबर सेलने तांत्रिक कौशल्याच्या जोरावर अमेरिकेतील बँकेतून एका उद्योजकाचे तब्बल ५६ लाख रुपये परत मिळवून देण्याची मोठी कामगिरी केली आहे. भोसरी येथील एका उद्योजकाची झालेली ही फसवणूक पोलिसांनी अत्यंत शिताफीने उघडकीस आणली.

नेमका प्रकार काय?

भोसरी येथील ‘PHBB VALVES PVT LTD’ या कंपनीचे मालक संजय जाधव यांची हार्डवेअर क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. व्यवसायानिमित्त त्यांचे चीनमधील ‘Wenzhou Artech Machinery Technology’ या कंपनीशी नियमित व्यवहार होतात. या व्यवहारावर लक्ष ठेवून असलेल्या एका अज्ञात सायबर चोरट्याने चिनी कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीशी साधर्म्य असलेला एक बनावट ईमेल आयडी तयार केला. ६ एप्रिल २०२६ रोजी जाधव यांना या बनावट ईमेलवरून संदेश आला की, कंपनीने आपले बँक खाते बदलले असून नवीन खात्यावर व्यवहार करावा. ईमेल अधिकृत वाटल्याने जाधव यांनी कोणतीही शंका न घेता ५६ लाख रुपये अमेरिकेतील ‘सिटीझन बँक’ मधील संबंधित खात्यावर वर्ग केले.

अशी झाली फसवणूक उघड

पैसे पाठवल्यानंतर जाधव यांनी जेव्हा चीनमधील कंपनीच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. कंपनीने कोणतेही खाते बदलले नसल्याचे समोर आले. आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जाधव यांनी वेळ न घालवता ऑनलाइन तक्रार नोंदवली आणि भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

सायबर पोलिसांचे ‘मिशन अमेरिका’

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे आणि त्यांच्या पथकाने तातडीने सूत्रे हलवली. हा व्यवहार आंतरराष्ट्रीय असल्याने आव्हान मोठे होते. सायबर पोलिसांनी अमेरिकेतील ‘सिटीझन बँक’ आणि तिथल्या नोडल ऑफिसर्सशी तत्काळ ईमेलद्वारे संपर्क साधला. सर्व तांत्रिक पुरावे आणि व्यवहारातील त्रुटी बँकेला सादर केल्या.हा व्यवहार सायबर गुन्ह्याचा भाग असल्याचे बँकेला पटवून दिले.पोलिसांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अमेरिकेतील बँकेने ती रक्कम तातडीने ‘फ्रीज’ केली आणि आता ती संपूर्ण ५६ लाखांची रक्कम संजय जाधव यांच्या खात्यात सुखरूप परत जमा झाली आहे.

“नागरिकांनी कोणत्याही ईमेलवर विश्वास ठेवून पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्ती किंवा कंपनीशी फोनवर संपर्क साधून खातरजमा करावी. फसवणूक झाल्यास पहिल्या दोन तासांत तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते.”
– सायबर पोलीस विभाग, पिंपरी-चिंचवड

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!