
नसरापूर हत्याकांड: त्या ‘गाठोड्यात’ नेमकं होतं काय?; चिमुरडीच्या मृतदेहावरील जखमांनी पोस्टमार्टममध्ये उडवला थरार
भोर तालुक्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याच्या पोलीस कोठडीत विशेष न्यायालयाने १२ मे पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, पोलीस तपासात आणि शवविच्छेदन अहवालात काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

शवविच्छेदन अहवालातील थरार

पोलिसांनी गुरुवारी (७ मे) न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, या जखमा कोणत्याही साध्या वस्तूने नसून ‘टणक हत्याराने’ केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने चिमुरडीवर अत्याचार करताना किंवा त्यानंतर कोणत्या शस्त्राचा वापर केला, याचा शोध आता ग्रामीण पोलीस घेत आहेत.

सीसीटीव्हीमधील ‘ते’ गाठोडं आणि शेवपुड्याचा सुगावा
या प्रकरणाला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा पुरावा सीसीटीव्ही फुटेजच्या रूपाने पोलिसांच्या हाती लागला आहे. या घटनेनंतर आरोपी भीमराव कांबळे एक गाठोडे घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. त्या गाठोड्यात नेमके काय होते? त्याने शस्त्राची विल्हेवाट लावली की कपडे लपवले? याचा तपास पोलीस करत आहेत.घटनेपूर्वी आरोपी आणि पीडित मुलगी एका गोठ्याकडे जाताना त्यांच्या हातात शेवपुडा दिसत आहे. तो शेवपुडा कोणत्या दुकानातून खरेदी केला, याचा शोध घेऊन पोलीस साक्षीदार गोळा करत आहेत.
न्यायालयातील युक्तिवाद
आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. विशेष सरकारी वकील अॅड. अरुंधती ब्रह्मे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, “गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे, गाठोड्याचा शोध घेणे आणि या गुन्ह्यात त्याला कोणाची मदत लाभली का, याचा तपास करणे आवश्यक आहे.”दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीला १२ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांकडून कसून तपास
पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अत्यंत वेगाने तपास करत आहेत. आरोपीने वापरलेले हत्यार शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. तसेच, गावातील सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक दुकानदारांकडे चौकशी करून गुन्ह्याची साखळी जोडण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे नसरापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीला कठोरत-कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

