
एआय जगतात आघाडीवर असलेल्या गुगलने आपल्या ‘जेमिनी’ (Gemini) एआय चॅटबॉटसाठी एक मोठा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केला आहे. गुगलने अँड्रॉइड, आयओएस (iOS) आणि वेब प्लॅटफॉर्मवर नवीन ‘थिंकिंग लेव्हल्स’ (Thinking Levels) रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या नवीन फीचर्समुळे आता जेमिनी केवळ झटपट उत्तरे देणार नाही, तर माणसाप्रमाणे प्रश्नांवर ‘सखोल विचार’ करून अचूक उत्तर देणार आहे.

काय आहे ‘एक्सटेंडेड थिंकिंग’ मोड?

या नव्या अपडेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ‘एक्सटेंडेड थिंकिंग’ मोड. हा मोड कठीण गणिती कोडी, कोडिंग आणि क्लिष्ट व्यावसायिक समस्या सोडवण्यासाठी खास डिझाइन करण्यात आला आहे.सामान्य मोड जिथे बहुतांश प्रश्नांची उत्तरे काही सेकंदांत त्वरित देतो, तिथे ‘एक्सटेंडेड थिंकिंग’ मोड काहीसा अतिरिक्त वेळ घेऊन प्रश्नाचा सखोल अभ्यास करेल.यामुळे रिसर्च करणारे विद्यार्थी, वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील लोकांना अत्यंत सविस्तर आणि अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, हे फिचर भारतासह जगभरातील फ्री आणि पेड अशा दोन्ही युझर्ससाठी उपलब्ध करून दिले जात आहे.

जेमिनीच्या नव्या मॉडेल्समध्ये बदल
गुगलचे जेमिनी आणि एआय स्टुडिओचे व्हाइस प्रेसिडेंट जोश वुडवर्ड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर (ट्विटर) ही माहिती दिली आहे. हा बदल जेमिनी ३.१ फ्लॅश-लाइट, जेमिनी ३.५ फ्लॅश आणि जेमिनी ३.१ प्रो मॉडेल्समध्ये केला जात आहे. सामान्यतः या मॉडेल्समध्ये दोन थिंकिंग लेव्हल्स दिले गेले आहेत, जे युझर्सच्या गरजेनुसार उत्तरे तयार करतात. वेगवेगळ्या थिंकिंग लेव्हल्समुळे एआयला युझर्सचे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल, असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे.
‘डीप थिंक’ ने वाढवली उत्सुकता!
गुगलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जेमिनी ३.१ प्रो मॉडेलसाठी “डीप थिंक” ही तिसरी थिंकिंग लेव्हल देखील दाखवली आहे. ही लेव्हल एआयला एकाच वेळी अनेक पातळ्यांवर विचार करण्याची आणि समांतर तर्क करण्याची अद्भूत क्षमता देते. मात्र, सध्या ही प्रगत सुविधा केवळ ‘गुगल एआय अल्ट्रा’ सबस्क्रिप्शन घेतलेल्या पेड युझर्ससाठीच उपलब्ध असेल.
याच महिन्यात येतंय ‘जेमिनी ३.५ प्रो’
नुकत्याच पार पडलेल्या ‘गुगल आय/ओ २०२६’ (Google I/O 2026) या डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये कंपनीने जेमिनी ३.५ सिरीजची घोषणा केली होती. यामध्ये ‘जेमिनी ३.५ फ्लॅश’ सध्या युझर्ससाठी उपलब्ध असून, या महिन्याच्या अखेरीस ‘जेमिनी ३.५ प्रो’ देखील लाँच केला जाणार आहे. हे नवीन मॉडेल्स जुन्या जेमिनी ३.१ प्रो ची जागा घेतील आणि युझर्सचा एआय वापरण्याचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकतील.

