
पुण्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘शेती’ जमीन ‘बिगरशेती’ करण्याचा प्रयत्न; जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सह्या
पुण्याच्या केसनंद परिसरामध्ये बनावट कागदपत्रे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्यांचा वापर करून शेती झोनचे बिगर शेती (NA) झोनमध्ये रूपांतर करण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका सतर्क तलाठ्यामुळे हा संपूर्ण बनावटगिरीचा प्रकार उघड झाला असून, यामुळे जिल्हा प्रशासनाची आणि संभाव्य ग्राहकांची होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

असा उघड झाला बनावटगिरीचा डाव

केसनंद येथील शेतकरी बाबासाहेब हरगुडे याने जमीन बिगरशेती करण्याचा फेरफार केसनंदचे तलाठी शुभम बावळे यांच्याकडे सादर केला होता. मात्र, हे कागदपत्र तपासताना तलाठी बावळे यांना संशय आला. मुळात केसनंद गाव हे लोणी काळभोर अतिरिक्त तहसीलदार कार्यालयाच्या क्षेत्रात येते. असे असतानाही हरगुडे याने सादर केलेल्या कागदपत्रांवर हवेली तहसील कार्यालयाचे लेटरहेड होते आणि त्यावर तहसीलदार तृप्ती कोलते यांची सही होती. कोलते या लोणी काळभोरच्या तहसीलदार असल्याने, हवेलीच्या लेटरहेडवर त्यांची सही पाहून तलाठ्याचा संशय बळावला. त्यांनी बारकाईने तपास केला असता ती सही बनावट असल्याचे उघड झाले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह्या आणि डिजिटल स्वाक्षऱ्याही बनावट!
या प्रकरणाचा तपास केला असता, आरोपीने केवळ तहसीलदारांचीच नाही तर महसूल आणि भूमी अभिलेख विभागातील अनेक बड्या अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर केल्याचे समोर आले. तहसीलदार तृप्ती कोलते यांची बनावट सही आणि चुकीचे लेटरहेड वापरले.भूमी अभिलेख विभागाचे हवेली उपअधीक्षक विकास गोफणे यांच्या सहीचा मोजणी आदेशही बनावट आढळला. पीएमआरडीए च्या आदेशातही मोठी बनावटगिरी करण्यात आली.सर्वात धक्कादायक म्हणजे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या डिजिटल स्वाक्षरीचा खोटा आदेश तयार करण्यात आला.इतकेच नव्हे तर थेट जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सहीचाही यात गैरवापर करण्यात आला होता.
जिल्हाधिकाऱ्यांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश; सखोल चौकशी सुरू
तलाठी शुभम बावळे यांनी हा प्रकार तातडीने तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या निदर्शनास आणून दिला. कोलते यांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या घोटाळ्याची कल्पना दिली. स्वतःच्याच सह्यांचे बनावट आदेश पाहून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली असून, अतिरिक्त तहसील कार्यालयाला संबंधित शेतकऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, लोणी काळभोर तहसील कार्यालय क्षेत्रात अशा प्रकारे बनावट कागदपत्रांद्वारे आणखी काही जमिनी लाटण्याचे किंवा एनए करण्याचे प्रकार झाले आहेत का, याची सखोल चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिले आहेत.

