
‘सून आणि लेक आमच्यासाठी लक्ष्मीच…’; पिंपरीतील बारणे कुटुंबाकडून लाखो रुपयांच्या चांदीच्या पादत्राणांची खरेदी
हिंदू परंपरेत तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या ‘अधिक मासाला’ (धोंड्याचा महिना) विशेष महत्त्व आहे. या महिन्यात जावयाचे लाड करण्याची, तसेच लेकीला वाण देण्याची जुनी परंपरा आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एका सासरच्या मंडळींनी जावयाला चक्क चांदीच्या चप्पला भेट दिल्याचं वृत्त गाजलं होतं. मात्र, आता पिंपरी-चिंचवडमधील एका कुटुंबाने लेकीसोबतच सुनेचाही तितकाच सन्मान करत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. पिंपरी-चिंचवडमधील बारणे कुटुंबीयांनी आपल्या सुनेला आणि मुलीला लाखो रुपये किमतीच्या चांदीच्या भरीव चपला (पादत्राणे) भेट दिल्या आहेत, ज्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.

परंपरेला दिला आधुनिक आणि आगळावेगळा टच

अधिक मास महिन्यात माहेरच्या मंडळींकडून मुलीला चांदीचे पैंजण किंवा जोडवी भेट देण्याची हिंदू परंपरा आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील संतोेषनगर भागात राहणाऱ्या सचिन नागोभाऊ बारणे कुटुंबीयांनी या परंपरेला एक पाऊल पुढे नेले आहे. त्यांनी आपल्या सून आणि मुलीसाठी अक्षरशः लाखो रुपये किमतीची चांदीची पादत्राणे तयार करून घेतली आहेत.

चांदीच्या चपलांमागील खास कारण काय?
बारणे कुटुंबीयांनी या अनोख्या भेटीसाठी पिंपरी-चिंचवडमधील एका नामांकित ज्वेलर्सकडे विशेष ऑर्डर दिली होती. त्यानुसार त्यांनी ३ जोड्या चांदीची पादत्राणे बनवून घेतली.चांदी हा धातू अत्यंत मूल्यवान आहेच, पण त्याचसोबत तो शरीरातील उष्णता शोषून घेणारा (शीतल) मानला जातो. हाच विचार करून त्यांनी चांदीची पादत्राणे निवडली.सून आणि लेकीसाठी खरेदी केलेल्या प्रत्येक चांदीच्या पादत्राणांची किंमत जवळपास १ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
“आमची सून आणि मुलगी म्हणजे घरची लक्ष्मी!”
या अनोख्या उपक्रमाबद्दल भावना व्यक्त करताना बारणे कुटुंबीय म्हणाले, “आमची मुलगी ज्याप्रमाणे आमच्यासाठी लक्ष्मीसारखी आहे, अगदी त्याचप्रमाणे आमची सून देखील आमच्यासाठी लक्ष्मी स्वरूप आहे. समाजात अनेकदा सून आणि मुलगी असा भेद केला जातो, पण आमच्यासाठी दोघीही सारख्याच आहेत. म्हणूनच अधिक मासाचे औचित्य साधून आम्ही दोघींनाही चांदीची पादत्राणे भेट देण्याचे नियोजन केले.सध्या सोशल मीडियावरून जावयांच्या लाडाचे अनेक व्हिडिओ आणि बातम्या समोर येत असताना, बारणे कुटुंबीयांनी सुनेला दिलेल्या या आदराचे आणि प्रेमाचे कौतुक नेटीझन्सकडून मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.

