
शाहूवाडी तालुक्यातील शहापूर येथील माजी महिला सरपंच सुरेखा न्यारे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. प्राथमिक तपासात आणि चर्चेत ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे म्हटले जात होते. मात्र, आता या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले असून पैशांच्या वादातूनच ही हत्या झाल्याचा नवा आणि खळबळजनक दावा केला जात आहे.

लग्नाचा तगादा की पैशांचा वाद? काय आहे नवा दावा?

सुरेखा न्यारे या आरोपी प्रकाश पाटील याच्याकडे लग्नासाठी वारंवार दबाव टाकत असल्यानेच प्रकाशने त्यांचा काटा काढल्याची चर्चा सुरुवातीला रंगली होती. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार, सुरेखा यांनी लग्नासाठी कोणताही तगादा लावला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश पाटील याला गाडी खरेदी करण्यासाठी सुरेखा यांनी स्वतःचे सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक मदत केली होती. हेच गहाण ठेवलेले दागिने सोडवून देण्यासाठी सुरेखा यांनी प्रकाशकडे पैशांची मागणी लावून धरली होती. मात्र, प्रकाश पैसे देण्यास वारंवार टाळाटाळ करत होता. या पैशांच्या आणि दागिन्यांच्या सततच्या मागणीला कंटाळूनच प्रकाशने सुरेखा यांच्या हत्येचा कट रचल्याची जोरदार चर्चा सध्या गावात सुरू आहे.

नेमकी घटना कशी घडली?
सुरेखा न्यारे आणि प्रकाश पाटील हे एकाच गल्लीत राहत असल्याने त्यांच्यात ओळख आणि प्रेमसंबंध निर्माण झाले होते.रविवारी सकाळी आरोपी प्रकाशने सुरेखा यांना पंढरपूरला जाण्याचे सांगून कारमध्ये बसवले.पंढरपूरला नेण्याऐवजी त्याने सुरेखा यांना गावाबाहेरील लिंडोरी येथील एका जनावरांच्या शेडमध्ये नेले. तिथे त्याने सुरेखा यांचा गळा आवळून अतिशय निर्घृणपणे खून केला.
भाच्याच्या प्रसंगावधानामुळे पुरावा नष्ट करण्याचा डाव उधळला
सुरेखा यांची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी प्रकाशने अत्यंत भयानक प्लॅन आखला होता. हत्येनंतर त्याने मृतदेह एका पोत्यात भरला आणि कारमधून थेट मुंबईजवळील ठाणे जिल्ह्यातील कशेळी येथील समुद्रात टाकण्यासाठी निघाला. कशेळी येथे पोहोचल्यानंतर मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी त्याला मदतीची गरज होती, म्हणून त्याने ठाण्यात राहणारा त्याचा भाचा संदेश याला फोन केला. मात्र, मामाच्या संशयास्पद हालचाली आणि फोनवरील संभाषणामुळे भाच्याला तात्काळ संशय आला. संदेशने कोणताही वेळ न गमावता प्रसंगावधान राखत थेट पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून नारपोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रकाश पाटील याला ताब्यात घेतले आणि मृतदेह समुद्रात फेकून पुरावा नष्ट करण्याचा त्याचा डाव उधळून लावला. सध्या या प्रकरणाचा पुढील सखोल तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे करत आहेत.
एकुलता एक मुलगा अनाथ; शिरगाव परिसरावर शोककळा
सुरेखा न्यारे यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वीच गंभीर आजारपणाने निधन झाले होते. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांचा एकुलता एक मुलगा शुभम याच्यावर अगदी लहान वयातच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली होती. वडिलांनंतर आता अचानक आईचेही छत्र हरपल्यामुळे शुभम पूर्णपणे अनाथ झाला आहे. या दुर्दैवी आणि सुन्न करणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण शिरगाव परिसरावर आणि शहापूर गावात शोककळा पसरली आहे.

