Latest Marathi News
Ganesh J GIF

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा!; NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एसटी बस प्रवासात राज्य शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या अंमलबजावणीला आता १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना अद्याप हे स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने, त्यांची ऐन प्रवासात गैरसोय होऊ नये म्हणून महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

पूर्वीची डेडलाईन १ ऑगस्ट; सवलतींपासून वंचित राहू नये म्हणून निर्णय

यापूर्वी महामंडळाने १ ऑगस्टपासून एसटी प्रवासातील सवलतींसाठी हे डिजिटल कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. राज्य शासनाच्या वतीने ७५ वर्षांवरील ‘अमृत ज्येष्ठ नागरिकांना’ मोफत प्रवास, तर ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलती अधिक सुलभ, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी १ ऑगस्टची तारीख निश्चित करण्यात आली होती.

मात्र, राज्यातील लाखो प्रवाशांनी या कार्डसाठी नोंदणी केली असली, तरी तांत्रिक कारणामुळे अनेकांना प्रत्यक्ष कार्ड मिळालेले नाही. केवळ कार्ड उपलब्ध झाले नाही म्हणून पात्र प्रवासी शासनाच्या सवलतीपासून वंचित राहू नयेत, याची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुदतवाढ देण्याचे निर्देश दिले.

“कोणत्याही प्रवाशाची हेळसांड खपवून घेणार नाही” – प्रताप सरनाईक

मुदतवाढीची घोषणा करताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणामुळे कोणत्याही पात्र ज्येष्ठ नागरिक अथवा महिला प्रवाशाची गैरसोय होऊ नये, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळे आम्ही अंमलबजावणीला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.” यासोबतच पात्र प्रवाशांनी या वाढीव एका महिन्याचा उपयोग करून आपले NCMC स्मार्ट कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

बस डेपोंवर गर्दी; जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी

सध्या राज्यभरातील सर्वच बस डेपो आणि शहरी केंद्रांवर हे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. याच दरम्यान काही ठिकाणी नागरिकांना हे कार्ड जादा दराने विकले जात असल्याच्या गंभीर तक्रारी देखील समोर आल्या आहेत. या सर्व गोंधळात प्रवाशांची आणि ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबावी, म्हणूनच शासनाने हा निर्णय एक महिना पुढे ढकलला आहे. आता प्रवाशांना १ सप्टेंबरपर्यंत जुन्या पद्धतीनेच सवलतीचा लाभ घेता येणार असून, तोपर्यंत नवीन कार्ड काढण्याची मुभा असेल.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!