Latest Marathi News
Ganesh J GIF

“भाजपची ऑफर होती, नाहीतर ठोकून काढू अशी धमकी दिली!’ अभिजित दिपके यांचा खळबळजनक दावा

जंतरमंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान एक अत्यंत खळबळजनक दावा समोर आला आहे. विद्यार्थी आंदोलक नेते अभिजित दिपके यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. “मला भाजपची ऑफर आली होती. तुम्ही या, नाहीतर ठोकून काढू,” अशी धमकी देण्यात आल्याचा दावा दिपके यांनी केला आहे.

केवळ एवढेच नाही, तर आपल्या आई-बाबांनाही पाहून घेण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला असून, “त्यांनी कितीही ऑफर्स दिल्या तरी मी भाजपमध्ये जाणार नाही,” असे स्पष्टीकरणही अभिजित दिपके यांनी दिले आहे.

पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर निशाणा साधत दिपके म्हणाले, “तुम्ही तुमच्या नातवाच्या वयाच्या मुलास धमक्या देत आहात. मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा आहे. या ३० वर्षांच्या मुलाला तुम्ही आणखी किती धमक्या देणार आहात?”

…तर हे अमित शहांचेच अपयश!

आंदोलनाला परदेशातून किंवा बाहेरून पैसा पुरवला जात असल्याच्या आरोपांचा समाचार घेताना अभिजित दिपके यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर थेट टीका केली. “जर आम्हाला बाहेरून पैसे येत असल्याचे म्हटले जात असेल, तर गृहमंत्री अमित शहा हे अपयशी ठरले आहेत असेच म्हणावे लागेल. आंदोलकांवर गोळीबार करण्याचे आदेशही अमित शहा यांनीच दिले होते. जर या आंदोलनाला परदेशातून पैसा येत असेल, तर हे गृहमंत्र्यांचेच अपयश आहे. मग ते कसले चाणक्य?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

रामदेवबाबांनी आपल्या प्रॉडक्ट्स विकण्याकडे लक्ष द्यावे!

‘जेन झी’ (Gen Z – आजची तरुण पिढी) संस्कृती बिघडवत असल्याच्या बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावरही दिपके यांनी तीव्र आक्षेप घेतला. “आमच्या हक्काच्या मागण्यांसाठी लढणे जर बदनामी असेल, तर ती आम्ही बघून घेऊ. रामदेवबाबांनी संस्कृतीवर बोलण्यापेक्षा आपल्या प्रॉडक्ट्स विकण्याकडे लक्ष द्यावे,” असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. तसेच, ‘जेन झी’ नेमके कोण आहेत? १५ ते २५ वयोगटातील हेच तरुण पुढे देश चालवणार आहेत, त्यांना ट्रोल करून काय उपयोग, असा सवालही त्यांनी केला.

नवीन शिक्षणमंत्र्यांवर आणि पोलिसांवर डागली तोफ

केंद्रीय मंत्रिमंडळातील बदलांवर बोलताना दिपके यांनी नवे शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावरही घणाघाती आरोप केले. “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना काढून प्रल्हाद जोशी यांना नेमण्यात आले आहे, ज्यांनी बिल्किस बानू प्रकरणात बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने मत व्यक्त केले होते. याचा अर्थ प्रधान यांना काढून एक विचित्र माणूस आणला आहे. या पक्षात हे असेच होणार, कारण त्यात सारे गुंडच भरले आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

आंदोलनादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर बोलताना ते म्हणाले, “आंदोलनात ‘जेन झी’ तरुण मोबाईलवर रेकॉर्डिंग करत आहेत, पण पोलिसांना या रेकॉर्डिंगची भीती का वाटते आहे? पोलिसांनी संविधानाच्या मार्गाने जावे. जर तसे होत नसेल, तर पोलिसांनी आपली खाकी चड्डी घालावी आणि थेट नागपूरला जावे.”

देशातील चारही स्तंभ धोक्यात!

विरोधकांना मदत करण्याच्या प्रश्नावर बोलताना अभिजित दिपके यांनी तपास यंत्रणांच्या गैरवापरावर बोट ठेवले. “सीबीआय (CBI) आणि ईडीच्या (ED) जोरावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष फोडले गेले. सध्या या देशातील लोकशाहीचे चारही स्तंभ धोक्यात आले आहेत,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

 

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!