
तपासाच्या नावाखाली कास पठारवर पर्यटन अन् मज्जा!; पुणे पोलिसांच्या ‘त्या’ महिला अधिकाऱ्यासह तिघांवर मोठी कारवाई
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी साताऱ्याला गेलेल्या पुणे पोलिसांचा एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. तपासाच्या नावाखाली चक्क पर्यटनस्थळे पाहण्याचा आनंद लुटणाऱ्या विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) तिघांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी या तिघांचीही दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची (Increment Stop) कडक शिक्षा सुनावली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्यात नियुक्तीस असलेले एक महिला पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार आणि एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

नेमकी घटना काय घडली?

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्याचा तपास संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकाकडे सोपवण्यात आला होता. या गुन्ह्यातील घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी ४ एप्रिल रोजी हे पोलीस पथक तक्रारदार महिलेला सोबत घेऊन सरकारी गाडीने साताऱ्याला गेले होते.
नियमानुसार साताऱ्यात पोहोचल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला कळवून त्यांची मदत घेणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. एका ढाब्यावर जेवण उरकल्यानंतर ते दुपारी सव्वातीनच्या सुमारास सातारा शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेले. विशेष म्हणजे, पंचनामा करताना त्यांनी घटनास्थळाच्या परिसरातील रहिवाशांकडे कोणतीही चौकशी किंवा तपास केला नाही, तसेच या तपासाची साताऱ्यातील संबंधित पोलीस ठाण्यात डायरी नोंद करणेही टाळले.
तक्रारदार महिला विनवणी करत राहिली, पोलीस कास पठारवर फिरत राहिले!
साताऱ्यातील पंचनाम्याचे सोपस्कार आटोपल्यानंतर या पोलीस पथकाने थेट पुण्याच्या दिशेने येणे अपेक्षित होते. मात्र, कर्तव्यात कसूर करत ही महिला अधिकारी, हवालदार आणि शिपाई थेट साताऱ्यातील प्रसिद्ध ‘कास पठार’ आणि इतर पर्यटनस्थळांवर फिरण्यासाठी निघून गेले.
यावेळी त्यांच्यासोबत असलेली तक्रारदार महिला प्रचंड मानसिक त्रासात होती. तिने पोलिसांना विनंती करत, “माझी आई आजारी आहे, ती घरी एकटीच आहे, मला लवकर घरी पोहोचणे गरजेचे आहे,” असे वारंवार सांगितले. मात्र, पोलिसांनी तिच्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. कास पठार आणि इतर पर्यटनस्थळे फिरून झाल्यानंतर हे पोलीस पथक एका महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी जेवणासाठीही गेले.
रात्री एक वाजता पुण्यात आगमन, महिलेला वाऱ्यावर सोडण्याचा प्रयत्न
पर्यटन आणि जेवणावळी आटोपून हे पोलीस पथक मध्यरात्री १ च्या सुमारास पुण्यात पोहोचले. पुण्यात आल्यानंतरही त्यांनी तक्रारदार महिलेला सुरुवातीला स्वारगेट येथेच एकटे सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने पुन्हा विनंती केल्यानंतर तिला नारायण पेठ पोलीस चौकीत सोडून हे पोलीस निघून गेले.
वरिष्ठांकडे तक्रार अन् चौकशीत सत्य आले समोर
पोलिसांच्या या अजब आणि असंवेदनशील वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या पीडित महिलेने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या तिघांचीही खातेनिहाय चौकशी लावली. चौकशीदरम्यान संबंधित प्रकार पूर्णपणे खरा असल्याचे उघडकीस आले. सरकारी कर्तव्यावर असताना पर्यटन करणे आणि तक्रारदाराची अडचण न समजणे या गंभीर बाबींवरून अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी या तिघांनाही वेतनवाढ रोखण्याची मोठी शिक्षा दिली आहे.

