
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ राज्यभरात तीन टप्प्यांत राबवण्यात येत असून, आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील तब्बल १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला असून, ऑगस्ट महिन्यात ही दुसरी यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाणार आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात २२ जुलै रोजी ५५३ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील ५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची माहिती ‘महाआयटी’ (MahaIT) पोर्टलवर यशस्वीपणे अपलोड करण्यात आली आहे.

काय आहे ‘हेअरकट’चा वाद?

कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असतानाच, काही बँका ‘हेअरकट’चे कारण पुढे करून शेतकऱ्यांना नडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कर्जमाफीच्या यादीतील रक्कम आणि बँक खात्यातील मूळ रक्कम यात तफावत दिसत असल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

‘हेअरकट’ म्हणजे काय?
‘हेअरकट’ ही राज्य सरकार आणि बँका यांच्यातील अंतर्गत आर्थिक तडजोडीची प्रक्रिया आहे. शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा किती वाटा सरकार उचलेल आणि किती हिस्सा बँक स्वतः सोसणार, याविषयीची ही आर्थिक तडजोड असते. या प्रक्रियेचा शेतकऱ्यांशी थेट कोणताही संबंध नसतो आणि सरकारच्या मूळ कर्जमाफीच्या रकमेवर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही. काही बँका या तांत्रिक मुद्द्यावरून कर्जमाफी रोखत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना चिंता न करण्याचे आवाहन केले आहे. सरकार आणि बँकांमधील करारानुसार ही प्रक्रिया सुरळीत पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शासन आणि बँकांमधील ‘हेअरकट’चे अधिकृत सूत्र
थकीत कर्जाच्या कालावधीनुसार सरकार आणि बँकांमध्ये खालीलप्रमाणे वाटा निश्चित करण्यात आला आहे:
१ वर्षांपर्यंत थकीत कर्ज: सरकार ८५% वाटा उचलणार | बँक १५% बोजा सोसणार
२ वर्षांपर्यंत थकीत कर्ज: सरकार ७०% वाटा उचलणार | बँक ३०% बोजा सोसणार
३ वर्षांपर्यंत थकीत कर्ज: सरकार ५५% वाटा उचलणार | बँक ४५% बोजा सोसणार
४ वर्षांपर्यंत थकीत कर्ज: सरकार ४५% वाटा उचलणार | बँक ५५% बोजा सोसणार
४ वर्षांपेक्षा अधिक काळ थकीत कर्ज: सरकार ३५% वाटा उचलणार | बँक ६५% बोजा सोसणार
शेतकऱ्यांना कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन
दुसऱ्या यादीतील १६ लाख ९६ हजार खात्यांना विशिष्ट क्रमांक (Unique ID) देण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ही कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू राहणार असून, पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’तील ठळक मुद्दे
एकूण लाभार्थी: राज्यातील एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा थेट लाभ मिळणार आहे.
एकूण तरतूद: योजनेसाठी एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पावसाळी अधिवेशन तरतूद: कर्जमाफीसाठी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात २० हजार कोटी रुपयांची विशेष तरतूद मंजूर करण्यात आली आहे.
मदतीत मोठी वाढ: यापूर्वी कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांऐवी थेट २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे.

