
नंदुरबार शहरातून एक अत्यंत विचित्र आणि थरारक घटना समोर आली आहे. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून शहरात केवळ दोन माकडांनी असा काही उच्छाद मांडला आहे की, थेट शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ही माकडं नेमकी शाळा-कॉलेज भरण्याच्या वेळेसच येतात आणि थेट विद्यार्थ्यांना टार्गेट करतात. आतापर्यंत या माकडांच्या हल्ल्यात ४ विद्यार्थिनी आणि १ शिक्षक जखमी झाले असून संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

मैदानापासून थेट क्लासरूमपर्यंत माकडांचा धुमाकूळ!

या घटनेबाबत अधिक माहिती देताना दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलचे उपप्राचार्य दीपक सोनवणे यांनी सांगितले की, “बुधवारी सकाळी १० च्या सुमारास आमच्या कॉलेज परिसरात एक माकड आले. आधी ते मैदानावर फिरत होते आणि नंतर थेट वर्गखोल्यांमध्ये (Classrooms) घुसू लागले. सकाळी ११ वाजता जेव्हा लहान मुले शाळेत आली, तेव्हा कुतूहलापोटी मुलांनी माकडाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे दोन्ही माकडं अचानक प्रचंड आक्रमक झाली.”

शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मुलांना वाचवण्यासाठी माकडांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला, पण माकडांनी उलट त्यांच्यावरच हल्ले चढवले. या धावपळीत एक शिक्षक खाली पडून किरकोळ जखमी झाले. या दहशतीमुळे काही शाळांना खबरदारी म्हणून सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, तर जिथे शाळा सुरू आहेत तिथे विद्यार्थी प्रचंड भीतीच्या छायेखाली शिकत आहेत.
वन विभागाची धावपळ, पण माकडं अजूनही मोकळीच!
गेल्या दोन दिवसांपासून वन विभागाचे पथक या दोन्ही माकडांना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, चकमा देण्यात पटाईत असलेल्या या माकडांना जेरबंद करण्यात वन विभागाला अजूनही यश आलेले नाही. त्यामुळे शाळा प्रशासनाने या माकडांचा तात्काळ बंदोबस्त करून त्यांना दूर जंगलात सोडून यावे, अशी मागणी केली आहे.
वन विभागाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
हे केवळ दोनच माकडं असली तरी ती सध्या प्रचंड हिंसक झाली आहेत. त्यामुळे वन विभागाने शहरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना खालील गोष्टी पाळण्याचे आवाहन केले आहे:
माकडांना पाहण्यासाठी गर्दी करू नका आणि त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न करू नका.
कोणत्याही नागरिकाने किंवा मुलाने माकडांना खायला घालण्यासाठी जवळ जाऊ नये.
माकड दिसल्यास तातडीने वन विभागाला त्वरित माहिती द्यावी.

