
पुण्यात अनैतिक संबंधातून थरार!; मंगळवार पेठेत महिलेने प्रियकरावर केला चाकूने वार; तिघांवर गुन्हा दाखल
पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मंगळवार पेठेत अनैतिक संबंधातून एका व्यक्तीवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‘या’ तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

फरासखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रेश्मा रज्जाक शेख (वय ४०), रुखसार जावेद कोडगनुर (वय २३), सोहेल रज्जाक शेख (तिघे रा. भराव वस्ती, जुन्या बाजाराजवळ, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३७ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत रीतसर फिर्याद दिली आहे.

दुचाकी देण्यावरून झाला वाद आणि…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी रेश्मा हिचे तक्रारदार व्यक्तीसोबत गेल्या १६ वर्षांपासून अनैतिक संबंध आहेत. तक्रारदार व्यक्ती तिला घरखर्चासाठी नियमितपणे पैसेही द्यायचा.
नेमकी घटना काय घडली?
२८ जुलै रोजी रात्री रेश्माने तिच्या एका मित्राला वापरण्यासाठी दुचाकी दिली होती. या कारणावरून तक्रारदार व्यक्ती आणि रेश्मा यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपी रेश्माने फिर्यादीला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करत थेट चाकूने त्याच्या गालावर वार केला. या झटापटीत रेश्माची विवाहित मुलगी रुखसार आणि तिच्या साथीदारानेही तक्रारदार व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर जखमी व्यक्तीने तातडीने फरासखाना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार खिलारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पुण्यातील वाढत्या कौटुंबिक आणि अंतर्गत वादातून होणाऱ्या गुन्हेगारीमुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

