
“…तर समृद्धी महामार्गासारखा माझ्या राजकारणातही ‘एक्झिट’ असेल!”; पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ!
बीड जिल्ह्यातील परळी येथे आयोजित कवी संमेलनाच्या समारोप सोहळ्यात भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. “जर राजकारण माझ्या विचारांशी समरस नाही असे वाटले, तर जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो, तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल,” असे सूचक विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानाचे आता राजकीय वर्तुळात अनेक अर्थ काढले जात आहेत.

नेमके काय घडले?

परळीतील कवी संमेलनात एका कवीने राजकारणातील विसंगती, कामांमधील विलंब आणि सध्याच्या व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करणारी एक धारदार कविता सादर केली. या कवितेतील आशयाला पंकजा मुंडे यांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर बोलताना त्यांनी आपल्या मनातील भावना जाहीरपणे बोलून दाखवल्या.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
“मला जर राजकारण माझ्यासारखं वाटलं नाही, माझ्या विचारांशी ते समरस नाही असं वाटलं, तर जसा समृद्धी महामार्गावर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल. जो व्यक्ती बाहेर पडण्याची तयारी ठेवतो, तोच निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे राजकारण करू शकतो. म्हणूनच मी त्या कवितेला दाद दिली.”
राजकीय निवृत्तीचे संकेत की तत्त्वांची लढाई?
पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय विश्लेषकांमध्ये दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत काहींच्या मते, हे पंकजा मुंडे यांच्या आगामी राजकीय निवृत्तीचे किंवा मोठ्या निर्णयाचे संकेत असू शकतात. तर काहींच्या मते, हा कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या विचारांशी आणि तत्त्वांशी तडजोड न करण्याचा आणि प्रामाणिक राहण्याचा एक कणखर संदेश आहे.
…म्हणून कधी कधी निवृत्त व्हावंसं वाटतं!
परळी महामार्गाच्या दुरावस्थेबाबत, नागरिकांच्या समस्या आणि विकासकामांना होणाऱ्या विलंबावर भाष्य करताना पंकजा मुंडे काहीशा भावूक झाल्या. त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त करताना सांगितले की, “कधी कधी मनातून निवृत्त व्हावंसं वाटतं. मात्र, जेव्हा जनतेचा उत्साह, त्यांचं प्रेम, विश्वास आणि माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी पाहते, तेव्हा मला पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते.”
“कोंबडा झाकल्याने सूर्य उगवणं थांबत नाही!”
यावेळी पंकजा मुंडे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सकारात्मक टीकेच्या महत्त्वावरही जोरदार बॅटिंग केली. त्या म्हणाल्या. एखाद्याने सत्य मांडले नाही म्हणून सत्य बदलत नाही. कोंबडा झाकल्याने सूर्य उगवणं थांबत नाही. प्रत्येकामध्ये सकारात्मक टीका ऐकण्याची ताकद असली पाहिजे आणि त्यातून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची तयारीही असायला हवी.आपण अशा देशात आणि संस्कृतीत वाढलो आहोत जिथे कलाकार, साहित्यिक आणि सामान्य नागरिकांना त्यांचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पुन्हा एकदा पंकजा मुंडेंची ‘परखड’ भूमिका चर्चेत!
पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही अनेकदा पक्षांतर्गत आणि राज्यातील राजकीय घडामोडींवर आपली स्पष्ट आणि परखड भूमिका मांडली आहे. कवी संमेलनासारख्या सांस्कृतिक व्यासपीठावरून त्यांनी थेट ‘राजकीय एक्झिट’ची भाषा केल्यामुळे आगामी काळात यावर सत्ताधारी आणि विरोधकांकडून मोठ्या राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

