
महाराष्ट्रातील नव्या ‘धर्म रक्षा’ कायद्यांतर्गत पहिला गुन्हा दाखल!; थेट ब्रिटिश नागरिकावर पुण्यात कारवाई
महाराष्ट्रात आमिष, फसवणूक किंवा प्रलोभन दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र धर्म रक्षा अधिनियमा’ अंतर्गत पहिली मोठी कारवाई समोर आली आहे. पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात या नव्या कडक कायद्यानुसार थेट एका ब्रिटिश नागरिकाविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की काय घडलं?

पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये ब्रिटनमधून आलेल्या एका धार्मिक नेत्याच्या प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रवचनाच्या आडून आणि विविध प्रलोभने देऊन गरीब व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला.या आरोपानंतर खडक पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ब्रिटिश नागरिकाविरोधात नव्या कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या या प्रकरणातील कायदेशीर बाबी आणि आरोपांची कसून चौकशी करत आहेत.

कसा आहे हा नवा कडक कायदा?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर अमलात आलेल्या या कायद्यात अत्यंत कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत. या कायद्याखालील गुन्हा हा अजामीनपात्र (Non-bailable) असून आरोपीला सहजासहजी जामीन मिळणार नाही. दोषी आढळल्यास ७ वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. जर धर्मांतर झालेली व्यक्ती अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती-जमातीची असेल, तर शिक्षेचा कालावधी आणखी वाढू शकतो. एखाद्याने पुन्हा हा गुन्हा केल्यास त्याला १० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ५ लाखांचा दंड होऊ शकतो.
विवाहासाठी धर्मांतर आणि स्वेच्छेने धर्मांतर करण्याचे नियम
विवाह करण्याच्या उद्देशाने केलेले धर्मांतरही या कायद्याच्या कक्षेत येईल. मात्र, अशा विवाहातून जन्मलेल्या मुलाला आई-वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण कायदेशीर अधिकार मिळतील.जर कोणाला स्वखुशीने धर्म बदलायचा असेल, तर त्याला ६० दिवस आधी जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना (District Magistrate) सूचना देणे mandatory (अनिवार्य) असणार आहे.

