
महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गुप्त अध्यायाचा सनसनाटी खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा मोठा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. या पक्षांतरासाठी थेट काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही हिरवा कंदील दिला होता, मात्र तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या एका विरोधामुळे हा संपूर्ण प्लॅन कसा बारगळला, याचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी उघड केला आहे.

महाराष्ट्र सदना’तील तो थरार

पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे हे भाजपमधील तत्कालीन स्थानिक राजकारणाला आणि नागपूरच्या नेत्यांना कंटाळून अत्यंत अस्वस्थ होते. गोपीनाथ मुंडे यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी मध्यरात्री २ वाजता काँग्रेस नेते अहमद पटेल, पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. या निर्णयासाठी सोनिया गांधी यांची रीतसर परवानगी घेण्यात आली होती आणि त्यांनी या प्रवेशाला मंजुरीही दिली होती.

गोपीनाथ मुंडेंची अट आणि नागपूरच्या नेत्यांची भीती
गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये येण्यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली होती. “मला खासदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. पोटनिवडणूक लढवावी लागेल, पण भाजपचे नागपूरचे दोघे नेते मला सहज निवडून येऊ देणार नाहीत. त्यामुळे मला केंद्र सरकारमध्ये थेट मंत्रीपद द्यावे लागेल,” अशी मागणी मुंडेंनी केली होती.
यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांना राज्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते.
“माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी राजकीय चूक!”: डॉ. मनमोहन सिंग यांचा विरोध
सोनिया गांधींची परवानगी मिळाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण जेव्हा तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना भेटायला गेले, तेव्हा या प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले. डॉ. मनमोहन सिंग यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाराजी व्यक्त करत स्पष्ट सांगितले, “विरोधी पक्षाच्या उपनेत्याला मी पक्षात घेऊन थेट केंद्रीय मंत्री करणार नाही. पंतप्रधानांना न विचारता थेट सोनिया गांधींशी चर्चा करून आश्वासन देणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी राजकीय चूक ठरली. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे हा अधिकार पंतप्रधानांचाच असतो. अखेर मी गोपीनाथ मुंडेंना हे शक्य होणार नाही, असे स्पष्ट सांगितले अशी प्रांजळ कबुली पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
गोपीनाथ मुंडे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधील या गुप्त कराराचा खुलासा झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून मोठी चर्चा रंगली आहे.

