Latest Marathi News
Ganesh J GIF

उज्जैनमध्ये नागपंचमीला मोठी दुर्घटना टळली!; नागचंद्रेश्वर मंदिर परिसरात अफवेमुळे पळापळ; १३ भाविक जखमी

नागपंचमी आणि श्रावणी सोमवारच्या दुर्मिळ योगायोगामुळे उज्जैन येथील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिर आणि नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर लोटला आहे. मात्र, याच दरम्यान एका अफवेमुळे मंदिर परिसरात मोठी घबराट पसरली आणि अचानक पळापळ सुरू झाली. या गोंधळात १३ भाविक जखमी झाले आहेत.

‘वीज पसरल्याच्या’ अफवेने उडाला गोंधळ

महाकाल मंदिर परिसराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या श्री नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी हजारो भाविक तासनतास रांगेत उभे होते. हरसिद्धी मंदिर चौकाजवळ असलेल्या बॅरिकेड्समधील डीपी बॉक्समध्ये विद्युत प्रवाह उतरल्याची (करंट आल्याची) अफवा अचानक पसरली.या अफवेमुळे रांगेतील भाविकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि लोकांनी सैरावैरा पळण्यास सुरुवात केली. एकमेकांवर पडल्यामुळे आणि बॅरिकेड्सला धडकल्यामुळे १३ भाविक जखमी झाले.

जखमींवर चरक रुग्णालयात उपचार सुरू

या दुर्घटनेत गुजरात, बिहार आणि मध्य प्रदेशातून आलेले भाविक जखमी झाले आहेत. वापी (गुजरात) येथील एका भाविकाच्या पायाला बॅरिकेड्सची जोरदार धडक बसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. याशिवाय उज्जैन, ग्वाल्हेर, दरभंगा आणि वलसाड येथील महिला व तरुणांचा जखमींमध्ये समावेश आहे. प्रशासनाने तात्काळ सर्व जखमींना उपचारासाठी चरक रुग्णालयात दाखल केले आहे.

परिस्थिती नियंत्रणात; ५ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले दर्शन

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कोणतीही चेंगराचेंगरी झालेली नाही आणि भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.काही काळाच्या खोळंब्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत करण्यात आली आहे. वर्षातून केवळ एकदाच (नागपंचमीला) उघडणाऱ्या नागचंद्रेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच रांगा लागल्या असून, सकाळपर्यंत ५ लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!