
लातूरमध्ये ‘पैशांचा पाऊस’ पाडण्यासाठी १५ वर्षांच्या मुलीवर अघोरी विधीचा प्रयत्न!; १५ जणांवर पोक्सो अन् जादूटोणाविरोधी गुन्हा दाखल
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारा आणि अंगावर काटा आणणारा प्रकार समोर आला आहे. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘पैशांचा पाऊस’ पाडण्यासाठी एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करून अघोरी विधी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आंध्र प्रदेशातून आणले होते अल्पवयीन मुलीला

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर-उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ हा अघोरी प्रकार रचण्यात आला होता. अंधश्रद्धेपायी अंध झालेले आरोपी संगनमत करून पैशांचा पाऊस पाडण्यासाठी ‘लक्ष्मीपूजा’ आयोजित करत होते. या कथित विधीसाठी आंध्र प्रदेशातून एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आणण्यात आले होते आणि या विधीत तिचा वापर करण्याची तयारी सुरू होती.

महाराष्ट्रासह इतर राज्यांतील १५ जणांवर गुन्हा दाखल
उदगीर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी कठोर पाऊल उचलत एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३’ (कलम ३/३) सह ‘पोक्सो’ (POCSO Act) कायद्यातील कलम १२ व १८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या प्रमुख आरोपींची नावे कुंडलिक देवराव रूपनर (जि. बीड) ,सचिन साहेबराव भोंगळे (जि. अकोला),अनिकेत सुभाष राठोड (जि. परभणी) ,समीर टिनघरे (रा. पुणे) याशिवाय लक्ष्मण करंजी, सनेश पनिके, दुर्गाप्रसाद ईरकला, श्रीनिवास चिलमुला, बालाजी बिरादार, चंद्रया कारम, अनंतराव खुनिकार, राजेश ईपन्नापल्ली, सुनील डेंगले, राजू पवार आणि बालाजी यांचा समावेश आहे.हे आरोपी केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या शेजारील राज्यांमधील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.या घटनेमुळे पुन्हा एकदा अंधश्रद्धेचा भयानक चेहरा समोर आला असून, पोलीस आता या टोळीच्या मुळाशी जाऊन अधिक तपास करत आहेत.

