
राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला
'इतक्या' जागासाठी शिंदे भाजप विरूद्ध महाविकास आघाडी भिडणार
मुंबई दि २६(प्रतिनिधी) – राज्यात सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. पण याच गोंधळात राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात शिक्षक कोट्याची निवडणूक होणार आहे. १ नोव्हेंबरपासून निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होईल तर ३० डिसेंबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. एकूण पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या निवडणूकीत कोण बाजी मारणार हे पहावे लागणार आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीची जुनी मतदार यादी वापरली जात नाही. त्यामुळे १ नोव्हेंबर २०२२ पासून होणार नवीन मतदार नोंदणी सुरु केली जाणार आहे. १ ऑक्टोबर से ७ नोव्हेंबर दरम्यान पदवीधर शिक्षक मतदारांची नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे पुढील महिन्यापासून परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी उडणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे, बाळाराम पाटील, ना.गो.गाणार तर पदवीधर मतदार संघाचे डॉ. रणजित पाटील, डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाल फेब्रुवारी २०२३ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.
राज्यात अजूनही मुदत संपून गेल्यानंतरही महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुका अजूनही प्रलंबित असताना विधान परिषदेचे बिगुल वाजले आहे. सत्ताबदलानंतर पहिल्यांदा मोठी निवडणूक होणार असल्याने शिंदे फडणवीस युती कि महाविकास आघाडी यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता असणार आहे.