
“रस्ते आहेत तर अपघात होणारच!”; म्हाळुंगेत ११ वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी आमदार शंकर मांडेकरांचे बेजबाबदार वक्तव्य
पुण्यातील म्हाळुंगे परिसरात सोमवारी रात्री ट्यूशनवरून वडिलांसोबत घरी परतणाऱ्या ११ वर्षीय चिमुकल्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. निष्पाप बालकाचा जीव गेल्याने म्हाळुंगे परिसरात आधीच तीव्र संतापाचे वातावरण असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी केलेल्या एका बेजबाबदार विधानामुळे नागरिकांच्या रागाचा भडका उडाला आहे.

“रस्ते आहेत तर अपघात होणारच!”

अपघात घडलेल्या ठिकाणी आज सकाळी पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार शंकर मांडेकर यांना संतप्त स्थानिक नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवरून घेरले आणि प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदारांची जीभ घसरली. “रस्ते आहेत तर अपघात होणारच!” असे अत्यंत संवेदनहीन वक्तव्य त्यांनी केले. इतकेच नाही तर यावर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनाही त्यांनी दम भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

रस्त्यांची दुरवस्था अन् प्रशासनाचे दुर्लक्ष बळीस कारणीभूत?
सोमवारी रात्री ११ वर्षांचा चिमुकला आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून ट्यूशनवरून घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. रस्त्यांवरील खड्डे, दुरवस्था आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा थेट आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आमदार घटनास्थळी पोहोचताच संतप्त नागरिकांनी त्यांना थेट जाब विचारला.
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांची भेट घेणार: मांडेकर
आपल्या वादग्रस्त विधानानंतर बोलताना मांडेकर म्हणाले, अपघात झाल्यावर गुन्हा तर दाखल होणारच. मी गेल्या दोन वर्षांपासून विधानसभेच्या अधिवेशनात या भागातील रस्त्यांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहे. या रस्त्यांच्या प्रश्नावर आपण मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेणार आहोत. मात्र, एकीकडे ११ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूने कुटुंब उघड्यावर पडले असताना लोकप्रतिनिधीने असे बेजबाबदार विधान केल्याने म्हाळुंगे व मुळशी परिसरातील नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.

