Latest Marathi News
Ganesh J GIF

महाराष्ट्रात संतापाची लाट! जुन्नरमध्ये १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार व हत्येची घटना ताजी असतानाच, आता जुन्नर तालुक्यातून अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात एका १० वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली आहे. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना शिवसेना (शिंदे गट) आमदार शरद सोनवणे यांच्या स्वतःच्या गावात घडल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

ओळखीचा गैरफायदा घेत चिमुकलीवर अत्याचार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित १० वर्षांची मुलगी आणि संशयित आरोपी हे एकाच परिसरात शेजारी राहतात. ओळखीचा गैरफायदा घेत संशयित तरुणाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास चिमुकलीला फूस लावून शेतात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. मुलीला बराच वेळ न पाहिल्याने नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी तिची शोधशोध सुरू केली. त्यावेळी हा भीषण आणि थरारक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पिंपळवंडीत तणाव; आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी

घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच पिंपळवंडी ग्रामस्थांमध्ये अत्यंत तीव्र संताप निर्माण झाला आहे. निष्पाप चिमुकलीचा अशा क्रूर पद्धतीने बळी घेतल्याने आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक स्वतः घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे. या प्रकरणाचा तपास जलदगतीने (Fast-track) चालवून पीडितेला व तिच्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

पोलीस यंत्रणेकडून सखोल तपास सुरू

राज्यात अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी विविध तपास यंत्रणांना कामाला लावण्यात आले असून, फॉरेन्सिक टीम आणि तपासी अंमलदार घटनेशी संबंधित सर्व पुरावे गोळा करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!