Latest Marathi News
Ganesh J GIF

नीट, टीईटीनंतर आता नर्सिंगचाही पेपर फुटला!; परभणीत पर्यवेक्षिकेनेच काढला फोटो

राज्यात विविध स्पर्धा व शैक्षणिक परीक्षांमधील पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. नीट (NEET) आणि टीईटी (TET) परीक्षांमधील गैरप्रकार ताजे असतानाच आता नर्सिंगच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परभणीतील परीक्षा केंद्रावर खुद्द परीक्षा पर्यवेक्षिकेनेच प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून बहिणीला व्हॉट्सॲपवर पाठवल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

नेमका कसा घडला प्रकार?

परभणी शहरातील इंदिरा गांधी एएनएम नर्सिंग स्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाची जीएनएम प्रथम वर्षाची परीक्षा सुरू होती. परीक्षेदरम्यान पर्यवेक्षक राखी चव्हाण यांनी प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून स्वतःची बहीण राणी चव्हाण हिला व्हॉट्सॲपवर पाठवला.प्रश्नपत्रिका केंद्राबाहेर गेल्याची शंका आल्याने केंद्र निरीक्षक विश्वजीत मठपती यांनी राखी चव्हाण यांची चौकशी केली. त्यांच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात प्रश्नपत्रिकेचे फोटो आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी नानल पेठ पोलीस ठाण्यात राखी चव्हाण, राणी चव्हाण, प्रतीक्षा किरण खिल्लारे, ईश्वर बाराबोईना आणि दिलीप बोरकर या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठ्या रॅकेटची शक्यता; पोलीस तपासाला वेग

हा प्रश्नपत्रिकेचा फोटो आणखी कोणाकोणाला पाठवण्यात आला? यामागे काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का आणि हे एखादे मोठे रॅकेट आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यातील डेटाचे विश्लेषण सुरू आहे. या घटनेमुळे परीक्षा केंद्रांवरील सुरक्षेचा आणि प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!