
चाकण, तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील कोंडी फुटणार!; मेट्रोचा राजगुरुनगर आणि शिक्रापूरपर्यंत विस्तार; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश
चाकण आणि तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या औद्योगिक पट्ट्यात मेट्रो जाळे विस्तारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, निगडी ते चाकणनंतर आता चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या नव्या मेट्रो मार्गांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महामेट्रोला दिले आहेत.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि उपाययोजना

वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन उपाय म्हणून निगडी-चाकण मार्गासोबतच चाकण ते राजगुरुनगर आणि तळेगाव ते शिक्रापूर या मार्गांची व्यवहार्यता (Feasibility) तपासून डीपीआर तयार करण्याचे आदेश महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहेत.औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचा प्रवासातील वेळ आणि त्रास वाचवण्यासाठी क्लस्टरच्या माध्यमातून विशेष कामगार वसाहती (टाउनशिप) उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. तळेगाव आणि चाकण परिसरातील खड्डे व रस्त्यांच्या दुरुस्ती कामांची प्रत्यक्ष पाहणी करून उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

उद्योजक व प्रवाशांना मोठा दिलासा
चाकण आणि तळेगाव हे पुण्यातील अत्यंत महत्त्वाचे उत्पादन व ऑटोमोबाईल हब मानले जातात. मात्र, अपुऱ्या रस्त्यांमुळे येथे रोज होणाऱ्या भीषण वाहतूक कोंडीचा फटका कामगार, स्थानिक नागरिक आणि मालवाहतुकीला बसत होता. भविष्यात मेट्रोचा विस्तार झाल्यास या संपूर्ण औद्योगिक पट्ट्यातील कनेक्टिव्हिटी सुधारून वाहतूक कोंडीतून मोठी सुटका होणार आहे.

