
कचोरीत डझनभर उंदराच्या लेंड्या अन् डायनिंग एरियात उंदरांचा वावर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अन्नाची भयंकर हेळसांड
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खाद्यपदार्थांच्या सुरक्षेचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा बोजवारा उडाल्याचे अत्यंत संतापजनक प्रकार समोर आले आहेत. वैजापूर शहरातील एका दुकानातून आणलेल्या कचोरीत चक्क डझनभर उंदराच्या लेंड्या आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये ग्राहक जेवत असताना उंदीर मोकाट फिरत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

कचोरीत उंदराच्या लेंड्या: लहान मुलांनी खाल्ल्या दोन कचोऱ्या

अत्यंत किळसवाणा प्रकार: वैजापूर येथील एका ग्राहकाने स्थानिक कचोरी सेंटरवरून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. घरी पार्सल उघडून पाहिले असता कचोरीतील सारणात उंदराच्या लेंड्या स्पष्टपणे दिसून आल्या.संतापजनक बाब म्हणजे हा प्रकार लक्षात येण्यापूर्वीच घरातील लहान मुलांनी दोन कचोऱ्या खाल्या होत्या. खरेदी केलेल्या पाचही कचोऱ्यांमध्ये असाच घाणेरडा प्रकार आढळल्याने नागरिकांमधून प्रचंड रोष व्यक्त होत आहे. निष्काळजी दाखवणाऱ्या आणि अस्वच्छता बाळगणाऱ्या दुकानदारावर तातडीने गुन्हा दाखल करून दुकान सील करण्याची मागणी वैजापूरकरांनी केली आहे.

‘बोडखे काकू’ हॉटेलमध्ये डायनिंग एरियात उंदरांचा वावर
छत्रपती संभाजीनगर शहरातील अजबनगर येथील ‘बोडखे काकू’ हॉटेलच्या डायनिंग एरियामध्ये ग्राहक जेवण करत असताना उंदीर मोकाटपणे फिरताना दिसून आला. हा संपूर्ण प्रकार एका ग्राहकाने कॅमेऱ्यात कैद केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.हॉटेल्स आणि मिठाई दुकानांमधील अशा बेफिकिरीमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, अन्न व औषध प्रशासन (FDA) या बेजबाबदार हॉटेलचालकांवर कधी कडक कारवाई करणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

