Latest Marathi News
Ganesh J GIF

सुनेत्रा पवारांची पक्षात ‘सर्जिकल स्ट्राइक’!,”कामात दिरंगाई नको, निष्क्रिय नेत्यांना बदला”; अजितदादांच्या राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलांचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कोअर कमिटीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वादळी बैठक सोमवारी पार पडली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. आगामी राजकीय आव्हाने, पक्षाची संघटनात्मक बांधणी आणि विस्ताराबाबत या बैठकीत सविस्तर मंथन झाले. मात्र, या बैठकीत सुनेत्रा पवार यांचा आक्रमक आणि कडक पवित्रा पाहायला मिळाला.

“कामात उदासीनता खपवून घेणार नाही!”

बैठकीदरम्यान पक्षाच्या कामकाजात आणि संघटनात्मक रचनेत दिसून येणाऱ्या शिथिलतेबद्दल सुनेत्रा पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षात कोणतीही उदासीनता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद वाढवून पक्ष संघटना पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने उभी करण्याचे आदेश त्यांनी दिले.

“जे काम करणार नाहीत, त्यांना हटवा”

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत सुनेत्रा पवार यांनी अतिशय कडक शब्दांत सूचना दिल्या. “कामात दिरंगाई करू नका. जे पदाधिकारी सक्रिय नाहीत, त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा आणि त्यांच्या जागी काम करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी द्या,” असे स्पष्ट आदेश त्यांनी वरिष्ठांना दिले. निष्ठावान आणि कष्टाळू तरुणांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवण्याचे संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

अंतर्गत मतभेद बाजूला ठेवण्याचे निर्देश

पक्षाचा विस्तार करायचा असेल तर अंतर्गत मतभेद आणि गटबाजी पूर्णपणे बाजूला ठेवावी लागेल, असे सांगत त्यांनी सर्वांना एकत्र येऊन काम करण्याचे निर्देश दिले. ज्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची कामगिरी असमाधानकारक आहे, त्यांच्यावर लवकरच कुऱ्हाड चालण्याची शक्यता असून, नजीकच्या काळात राष्ट्रवादीच्या संघटनेत मोठे फेरबदल पाहायला मिळू शकतात.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्यासह कोअर कमिटीचे सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पक्षातील सर्वच नेते आणि कार्यकर्ते आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!