
नावजलेल्या ब्रँडची फ्रँचायझी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका तरुणाला तब्बल ४ लाख २४ हजार ९०० रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘नॅचरल आईस्क्रीम’ (Natural Ice Cream) या प्रसिद्ध ब्रँडची फ्रँचायझी देण्याच्या नावाखाली ही ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारक आणि ई-मेल वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संकेत मनसुखलाल शहा (वय ३३, रा. सुसंगीत अपार्टमेंट, मित्रमंडळ सोसायटी, पर्वती) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नक्की काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २१ एप्रिल दरम्यान आरोपींनी फिर्यादी शहा यांच्याशी फोन आणि ई-मेलद्वारे संपर्क साधला. आपण ‘नॅचरल आईस्क्रीम’ कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आरोपींनी शहा यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर फ्रँचायझी मंजुरी, नोंदणी शुल्क, सिक्युरिटी डिपॉझिट आणि इतर कागदपत्रांच्या प्रक्रियेच्या नावाखाली आरोपींनी शहा यांच्याकडून वेळोवेळी एकूण ४ लाख २४ हजार ९०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.

पैसे उकळल्यानंतरही फ्रँचायझीबाबत कोणतीही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आणि आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केल्याने आपली फसवणूक झाल्याचे शहा यांच्या लक्षात आले.आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शहा यांनी पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात मोबाईलधारक आणि ई-मेल आयडी वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हिवरकर करत आहेत.
सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन
कोणत्याही प्रसिद्ध ब्रँडची फ्रँचायझी किंवा डीलरशिप हवी असल्यास नेहमी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरूनच संपर्क साधावा. इंटरनेटवर सर्च करताना मिळणाऱ्या अनोळखी फोन नंबरवर किंवा ई-मेलवर विश्वास ठेवून थेट पैसे भरू नयेत.कोणतीही आर्थिक देवाणघेवाण करण्यापूर्वी संबंधित कंपनीच्या मुख्य कार्यालयात जाऊन किंवा अधिकृत प्रतिनिधींशी भेटून खात्री करून घ्यावी. फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.

