
हिंजवडीतील वाहतूक कोंडी फुटणार! रस्त्यांच्या विकासासाठी ४२६ कोटींचा निधी मंजूर; जिल्हाधिकाऱ्यांचे तातडीने कामाचे आदेश
आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी ४२६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, ‘एमआयडीसी’ने (MIDC) यावर तातडीने कार्यवाही सुरू करावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या उच्चस्तरीय समितीच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या सर्वाधिक आहे, तेथे प्राधान्याने कामे सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मेट्रो स्थानकांसाठी ‘लास्ट-माईल कनेक्टिव्हिटी’

हिंजवडीतील मेट्रो स्थानकांशी जोडणी करण्यासाठी सुमारे १९.१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा विकास प्रस्तावित करण्यात आला आहे. पीएमआरडीए क्षेत्र सुमारे ७.२२५ किलोमीटर रस्ते,एमआयडीसी क्षेत्र सुमारे ११.९७४ किलोमीटर रस्ते
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या रस्त्यांचा विकास करताना केवळ वाहनांची वाहतूक विचारात न घेता पादचारी आणि सायकलस्वारांसाठी स्वतंत्र व सुरक्षित सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल.

सार्वजनिक वाहतूक अन् ‘ट्रान्झिट हब’वर भर
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने तातडीने ‘ट्रॅफिक स्टडी’ (वाहतूक अभ्यास) करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हिंजवडी परिसरात ‘ट्रान्झिट हब’ विकसित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ‘पीएमपीएमएल’च्या (PMPML) डेपोसाठी उपलब्ध जागेचा वापर करण्यासोबतच इतर पर्यायी जागांचा शोध घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
गर्दीच्या वेळी जड वाहनांना बंदी
अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या जड वाहनांना हिंजवडी परिसरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या निर्णयाची कडक आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बैठकीला प्रमुख उपस्थिती
या उच्चस्तरीय बैठकीला आमदार शंकर मांडेकर, बाबाजी काळे, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पिंपरी-चिंचवड महापालिका वाहतूक विभागाचे उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह हिंजवडी, माण आणि वारुंजी गावांतील नागरिक उपस्थित होते.

