
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हडपसर परिसरात आज (५ सप्टेंबर) विविध दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हडपसर वाहतूक विभागाकडून परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.

‘हे’ मुख्य रस्ते राहणार बंद (सायंकाळी ५ ते रात्री ११)

१. माळवाडी रोड: ‘शिवधुंद प्रतिष्ठान’च्या दहीहंडी कार्यक्रमामुळे कुबेरा संकुल ते साधना सोसायटी हा रस्ता सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.
२. मनपा शाळा रस्ता: ‘हमराज ग्रुप’तर्फे आयोजित कार्यक्रमामुळे मित्तल ज्वेलर्स रोड ते मनपा शाळा क्रमांक ३२ कडे जाणारा रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांनी सुचवलेले पर्यायी मार्ग
वाहतूक कोंडीत न अडकता प्रवास करण्यासाठी पोलिसांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे:
साधना सोसायटीकडे जाण्यासाठी: नागरिकांनी रवी दर्शन मार्गे > कॅनॉल रोड > सिरम गेट या रस्त्याचा वापर करावा.
मनपा शाळा क्र. ३२ कडे जाण्यासाठी: वैभव थिएटर > सम्राट गार्डन मार्गे > कॅनॉल रोड या मार्गाने जावे.
पोलिसांचे आवाहन
वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन हडपसर वाहतूक विभागाने केले आहे. तसेच, परिस्थितीनुसार वाहतुकीत ऐनवेळी आवश्यक ते बदल केले जाऊ शकतात.

