Latest Marathi News
Ganesh J GIF

बारामतीत ‘ACB’चा मोठा धडाका!; ५ लाखांची लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहाथ अटकेत

कारवाई न करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. महेश अंकुश उगले (वय ३६, रा. विजयनगर, बारामती) असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून, या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

जिम आणि झुंबा क्लासवर कारवाई न करण्यासाठी तगादा

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या पत्नी बारामती परिसरात ‘झुंबा डान्स आणि जिम’ चालवतात. क्लासमुळे त्रास होत असल्याची तक्रार परिसरातील काही नागरिकांनी पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या चौकशीची जबाबदारी पोलीस हवालदार महेश उगले याच्याकडे सोपवण्यात आली होती. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी हवालदार उगले याने तब्बल ७ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कारवाईच्या भीतीपोटी तक्रारदाराने यापूर्वीच २ लाख रुपये उगलेला दिले होते. मात्र, उर्वरित ५ लाख रुपयांच्या रकमेसाठी उगले याने तक्रारदाराकडे सतत तगादा लावला होता.

माळेगाव रोडवर ‘ACB’ने रचला सापळा

वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने ७ सप्टेंबर रोजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत तक्रार दाखल केली. एसीबीने केलेल्या पडताळणीत उगले हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर मंगळवारी (८ सप्टेंबर) दुपारी तीन वाजताच्या सुमारास माळेगाव रोडवरील पीडीसीसी बँकेजवळ एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना हवालदार महेश उगले याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.

बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी ३५ वर्षीय तक्रारदाराच्या अर्जावरून महेश उगले याच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धडक कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील व त्यांच्या पथकाने पार पाडली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!