विधानभवनात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीसांच्या एकत्र एंट्रीने राजकीय धुराळा
भाजपाची उद्धव ठाकरेंना मैत्रीची हाक, राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधान
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि शिवसेना हे नाव व पक्ष गेल्यानंतर प्रथमच राज्याच्या राजकारणात आज एक महत्त्वाची घटना घडली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज विधान भवनामध्ये एकत्र एंट्री केली. यावेळी दोघांमध्ये धावती चर्चा देखील झाली.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. आणि हे अधिवेशन संपता संपता आज एक वेगळे चित्र सर्वांना पहायला मिळाले. एकेकाळी एकत्र नांदणारे शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आता एकमेकाचे शत्रू झाले आहेत. शिवसेनेतील फुटीमागे भाजपा असल्याचेही समोर आले आहे. ठाकरे आणि फडणवीस हे एकमेकांवर गंभीर आरोप करीत आहेत. राजकीय टीका आणि आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. असे असतानाच दोन्ही नेते गेटपासून विधान भवनापर्यंत एकत्र गेले. यावेळी त्यांनी उपस्थितांना नमस्कारही केला. तसेच, हसतमुखाने त्यांनी केलेली एंट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. हा प्रसंग पाहून राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. सध्याचे बेभरवशाचे राजकारण पाहता पुन्हा एकदा भाजप ठाकरे गट एकत्र येणार का? याची चर्चा रंगली आहे.
या भेटीबद्दक उद्धव ठाकरे म्हणाले की, फडणवीस आणि मी योगायोगाने भेटलो. आमच्यामध्ये फक्त हाय, हॅलो एवढीच चर्चा झाली. तसेच सध्याच्या सरकारची कोणतीच प्रगती नाही असे म्हणत त्यांनी मराठा भाषा भवन बांधण्याच्या मुद्यावर मत व्यक्त करताना शिंदे सरकारवर जोरदार टिका केली.