
‘खोक्याच्या चाैकशीसाठी उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा’
शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेचे आव्हान, ठाकरेंच्या राजीनाम्यावर मोठा गाैप्यस्फोट
नाशिक दि २७(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच बंडखोर आमदारांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी सुहास कांदे यांच्यावरही टिका केली होती. त्या टिकेनंतर कांदे यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.
शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा म्हणजे कुठल्या कंपनीकडून किती पैसे घेतले हे कळेल, असा घणाघाती आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला. उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नाही, तर श्रीधर पाटणकर यांची चौकशी होऊ नये म्हणून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, असा खळबळजनक दावा देखील कांदे यांनी केला आहे. सरकार बदलण्यासाठी आम्ही १ खोका काय १ रुपयाही घेतला असेल तर आमची नार्कोटेस्ट करा. तुम्ही किती खोके मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर घेतले, कुणाकडून घेतले अशा १० कंत्राटदारांची नावे मी सांगतो. जर हे खोटे वाटत असेल तर उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा असं खुलं आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे. त्याचबरोबर मालेगाव मध्ये फक्त टोमणे सभा झाली. उद्धव साहेब हिंदुत्व विसरून गेले आहेत अशी टीकाही कांदे यांनी केली आहे. दरम्यान या टीकेला संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर देत टिका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला नाही, पण मी म्हणतो, कांद्याला भाव मिळाला. गेल्यावर्षी एका कांद्याला भाव मिळाला. एक कांदा ५० खोक्याला विकला गेला असे म्हणत सुहास कांदे यांच्यावर टिका केली होती.