‘पंकजा मुंडेंना बदनाम करणारा एक गट भाजपामध्ये सक्रिय’
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कबुलीने मोठी खळबळ
बीड दि २१(प्रतिनिधी)- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत मोठं विधान केलं. “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे,” असं मत चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केलं. बीडमधील त्यांचा आणि पंकजा मुंडे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “भाजपामध्येच पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे, मी काही उपकार केलेले नाहीत.” असे सांगत बावनकुळेंनी ”पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता,” असेही आवर्जून सांगितले. पंकजा मुंडे या भाजपा सोडून कोठेही जाणार नाहीत, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भारतीय जनता पार्टी आहे असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.
बीडमधील कार्यक्रमातील स्टेजवरील व्हायरल व्हिडीओवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजाताईंना योग्य सन्मान मिळावा यासाठी माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता. कारण पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे या कृतीने त्यांचा अपमान झाला असे समजणे हे हस्यास्पद आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.