Latest Marathi News
Ganesh J GIF

भागवतांना भेटल्यानंतर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा?

वानखेडेकडे संघ व भाजपाची पोलखोल करणारी माहिती आहे का? पहा कोणाचा सवाल

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव करण्यासाठी सरसावले आहेत. समीर वानखेडे हे सरकारी अधिकारी असताना नागपुरमधील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना भेटले व त्यानंतरच सीबीआय चौकशीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे, हे संशयास्पद वाटते, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, समीर वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरु होण्याची कारणं काय? ‘दाल में कुछ काला है’ असे दिसत आहे. या प्रकरणात काही ना काही लपलेले आहे, काही तरी संशयास्पद आहे, किंवा समीर वानखेडे यांच्याकडे काहीतरी अशी माहिती आहे ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्षाची पोलखोल ते करु शकतात. तर दुसरीकडे वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु होताच महाराष्ट्रातील भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री फडणवीस व इतर काही मंत्री वानखेडेंच्या केसाला धक्का लावला तर पाहून घेऊ, असे म्हणत आहेत. सीबीआय, ईडी या तपास यंत्रणा तर भाजपा सरकारच्याच अखत्यारित आहेत मग वानखेडे यांच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का होत आहे? सरकारी अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाणे यात काही ना काही लपलेले आहे, हा काही आरोप नाही तर असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

महाविकास आघाडीतील जागा वाटपावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, प्रत्येक पक्षाने चाचपणी केली पाहिजे यात काही गैर नाही पण जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवरच होईल. काँग्रेस पक्षाने काही कमिट्या नेमलेल्या आहेत, सर्व बाजूंचा विचार करुन जागा वाटप होईल. महापुरुषांचा व संविधानाचा अपमान करणाऱ्या भाजपाला पराभूत करणे यासाठी आमचे काम सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!