धनुष्यबाणानंतर मशाल चिन्हही ठाकरेंच्या हातातून जाणार?
राज्य निवडणूक आयोगात तक्रार दाखल, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. पण त्यानंतरही ठाकरेंसमोर अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. कारण पक्ष हातातून गेल्यानंतर हाती असलेले मशाल चिन्ह देखील जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ठाकरे दुहेरी संकटात सापडले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, अशी मागणी समता पक्षाकडून करण्यात आली आहे. समता पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. शिवसेना पक्षावरुन वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह गोठवले होते. त्यावेळी ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले होते. ठाकरे गटाचे मशाल याच चिन्हावर अंधेरी येथील पोटनिवडणूक लढवली. मशाल हाती घेऊन ठाकरे गटाने निवडणूकीत आपला उमेदवार निवडून आणला होता. पण आता समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत ठाकरे गटाच्या अडचणी वाढवल्या आहेत. निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीवेळी समता पक्षाकडून मशाल चिन्हावर दावा करण्यात आला होते. पण या प्रकरणात निवडणूक आयोगाने त्यांचा दावा फेटाळून लावला होता. पण आता शिवसेना नाव आणि चिन्हाचे वाटप झाल्याने समता पक्ष आपले चिन्हा परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.