अजित पवार लवकरच होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?
अजित पवारांची साथ घेण्यामागे भाजपाची ही खेळी, शिंदे गटाची धाकधूक वाढली, शिंदे अडचणीत?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांसह सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकिय चर्चांना उधाण आले. त्यामुळे राष्ट्रवादी फुटल्याने अजितदादांसोबत कोण आणि साहेबांसोबत कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याचा फैसला ५ तारखेला होणार असला तरी अजित पवार यांची साथ घेण्यामागे मोठे राजकारण असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता देखील वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत.
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अजित पवार असं करणार माहिती होते. फक्त वाटाघाडी चालल्या होत्या. आता सुद्धा अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा शब्द असल्याची आमची माहिती आहे. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन किंवा अध्यक्षांकडून विरोधी निकाल घेऊन आपोआप बाजूला गेले, की मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिल्याचं माहिती आहे, असा दावा चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण शरद पवार यांची भेट का घेतली यावर देखील चव्हाण यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, शरद पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. शरद पवार महाविकास आघाडीचे घटक आहेत. समर्थन आणि प्रोत्साहन देण्यासाठी आलो आहे. शरद पवार भक्कमपणे राष्ट्रीय विरोधी पक्षांच्या आघाडीत आहेत. महाविकास आघाडी तशीच राहणार आहे. काही माणसं गेल्यामुळे परिणाम होणार आहे. तो दुरुस्त करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत, असे सांगितले. त्यामुळे १६ आमदार खरेच अपात्र ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपासोबत बोलणी सुरु आहेत असे वक्तव्य केले होते मात्र ते वक्तव्य कोणीही गांभीर्याने घेतले नव्हते. पण आता अजित पवार आपल्या समर्थक आमदारांबरोबर सत्तेत सामील झाल्याने तो दावा अधोरेखित झाला आहे.