अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील
शिंदे गटातील आमदाराचा भाजपाला सूचक इशारा, अजित पवारांमुळे महायुतीत शिंदेचे वजन घटले?
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण आता त्या भेटीनंतर वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यातच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात वाद असल्याचं चित्र आहे. पण प्रत्यक्षात तसं काही नसल्याचा ठाम दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देण्यासाठी त्यांनी शरद पवार यांना सोबत घेऊन येण्याची भाजपने अट ठेवल्याचा दावा केला आहे. त्यानंतर आता प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू अत्यंत धक्कादायक विधान केले आहे. कडू म्हणाले की, “अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत. समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून अजितदादांना मुख्यमंत्री केलं तर भाजपला खूप परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर समुद्राची खोली मोजता येईल; मात्र शरद पवार यांची बुद्धी मोजता येत नाही. भाजप शरद पवार यांना आपल्या दबावाखाली ठेवणार की शरद पवार हे भाजपला दबावाखाली ठेवतील हे सांगता येत नाही, त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री केले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असेही कडू म्हणले आहेत. त्यामुळे अजित पवार यांना मुख्यमंत्री केले तर शिंदे गट भाजपाची साथ सोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण महत्वाचे म्हणजे शरद पवार आणि अजित पवार हे भविष्यात एकत्र येऊ शकतात, असे भाकितही बच्चू कडू यांनी केला आहे. कारण राष्ट्रवादीचा गेम करण्यासाठी भाजपने पावलं टाकली असतील. पण शरद पवारच भाजपचा गेम करतील की काय अशी अवस्था आहे. असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे अजित पवार महायुती तुटण्याचे कारण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आजच्या मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला बोलावले नाही. फक्त मंत्र्यांनाच निमंत्रित केले आहे. असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. तसेच आता छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्रीपद स्वीकारणार नाही. तशी परिस्थिती आल्यास राजकुमार पटेल यांना आम्ही मंत्री करू, असं सूचक विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे.