पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का?
कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य असून सामाजिक एकोपा राखण्यात महाराष्ट्राचा लौकिक आहे परंतु मागील काही महिन्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम काही लोक करत असल्याचे दिसत आहे. दोन धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न काही संस्था, संघटना करत आहेत. काही लोक भडकाऊ विधाने करुन वातावरण गढूळ करत आहेत. राज्यातील वातावरण अशांत करुन कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची भेट घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा केली व निवेदन दिले. या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, गजानन देसाई, प्रवक्ते निजामुद्दीन राईन, सुनिल खांडगे आदी समावेश होता.
प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, अहमदनगर व त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले गेले. राज्यातील वातावरण खराब करुन कायदा सुव्यवस्था बिघडवणे राज्यासाठी चिंताजनक बाब असून अशा प्रकारांना खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. काही संघटनांचे नेते प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक स्वास्थ बिघडवत आहेत. अशा पद्धतीची भडकाऊ भाषणे व वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे असतानाही महाराष्ट्रात मात्र कोर्टाच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. राज्यातील पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरीला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना व महिला आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर केला हे अत्यंत गंभीर आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना तडीपार केले जात आहे. हा पोलिसी अत्याचार थांबवून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. मुंबई-वडोदरा महामार्गासाठी जमीन संपादन करताना आदिवासी महिलांवरही अत्याचार करण्यात आले. हा अत्याचार थांबवून संबंधीत पोलिसांवर कारवाई केली पाहिजे.
राज्यातून बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींची वाढती संख्या ही आणखी एक चिंताजनक बाब आहे. तसेच वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई सुरु केली असून त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरु आहे. वानखेडेने नामांकित व्यक्तींना ब्लॅकमेल करुन माया गोळा केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. वानखेडेंची सीबीआय चौकशी सुरु असताना गृहमंत्री फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवारांसह भाजपाचे अनेकजण वानखेडे यांचे समर्थन करत आहेत. वानखेडेला वाचवण्यासाठी भाजपाचे हे लोक का पुढे आलेत? वानखेडे भाजपाचा कोण लागतो? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला.