भिडेंचा बंदोबस्त करा आणि सभागृहात आजच निवेदन करा
संभाजी भिडेंच्या वक्तव्याचे पावसाळी अधिवेशनात पडसाद, विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांची कोंडी
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- संभाजी भिडे नावाचा इसम राष्ट्रपित्यावर टीकाटिप्पणी करतो, संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारने त्याचा आजच बंदोबस्त करावा आणि त्या संदर्भात सभागृहात निवेदन करावे, मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली.
थोरात पुढे म्हणाले, संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. संभाजी भिडे वारंवार असं बोलतो, त्याला पाठीशी नेमका कोण घालतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे ओळखले पाहिजे. कोणाच्या राजकीय फायद्यासाठी तो वारंवार अशी विधाने करतो? आम्ही सभागृहात संभाजी भिडेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. थोरात म्हणाले, पुरोगामी विचार संपवण्यासाठी एक यंत्रणा काम करते, असे आमचे स्पष्ट मत आहे. महापुरुष हे सर्वकालीन असतात, त्यांच्या विचारांचे आणि कृतीचे समाजाच्या उभारणीत मोठे योगदान असते. असे असताना हा सततचा खोडसाळपणा सरकारने सहन करू नये. कालही आम्ही क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण करणाऱ्यावर कारवाईची मागणी केली होती.
थोरात यांनी सरकारवर आरोप करताना सांगितले, एकूणच या संपूर्ण प्रकरणात सरकार गंभीर दिसत नाही. भिडे सारख्या विकृतीवर वेळीच कारवाई केली तर सरकारचा हेतू शुद्ध आहे असे म्हटले जाईल असेही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.