
बार्शी दि ७ (प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगर कारखान्याची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेडून विक्री करण्यात आली. हा कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ‘येडेश्वरी ॲग्रो’चे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी ६८ कोटी ६४ लाख रुपयांना विकत घेतला आहे. आर्यन शुगरचा ताबाही येडेश्वरी ॲग्रोला देण्यात आला आहे. त्यामुळे कारखाना सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण शेतकऱ्यांचे पैसे कारखान्याने अद्याप थकवले असल्यामुळे कारखाना चालू करु देणार नाही अशी भूमिका प्रभाकर देशमुख यांनी घेतली आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने माजी मंत्री दिलीप सोपल यांच्याशी संबंधित असलेल्या आर्यन शुगरला कर्ज दिले होते. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची ३६० कोटींची येणेबाकी होती. या कारखान्यासह अन्य लोकांकडे कर्ज थकीत राहिल्याने सोलापूर जिल्हा सहकारी बॅंक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली होती. जिल्हा बॅंकेचे प्रशासक तथा सहकार विभागाचे अतिरिक्त निबंधक शैलेश कोतमिरे यांच्या काळात ‘आर्यन शुगर’ची विक्री झाली आहे. बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे चेअरमन असलेल्या येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्ट्सने हा कारखाना ६८ कोटी ६४ लाख रुपयांना विकत घेतला आहे. आर्यन शुगरचा ताबा येडेश्वरी ॲग्रोला देण्यात आला आहे. येत्या गळीत हंगामापासून येडेश्वरी ॲग्रो युनिट नंबर-दोनचा भोंगा वाजणार आहे. येत्या गळीत हंगामापासून हा कारखाना सुरू होईल, अशी माहिती येडेश्वरी ॲग्रो प्रॉडक्टचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी दिली आहे
तत्पूर्वी जनहित शेतकरी संघटनेचे प्रमुख प्रभाकर देशमुख यांनी शेतक-यांची थकीते बिले देईपर्यंत आर्यनच्या एका नटालाही हात लावू दिला जाणार नाही अशी भुमिका घेतली आहे.ते म्हणाले की, शेतक-यांना ऊस वाहतूक, बील याबाबत एक रुपयाही देण्यात आलेला नाही आम्ही तेरा आंदोलने करूनही सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले.निबंधक कोथमिरे शेतकरी विरोधी भुमिका घेत आहेत असा आरोप देशमुख यांनी केला आहे.त्यामुळे आगामी काळातही आर्यनचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.