Latest Marathi News
Ganesh J GIF

सावधान! बकरी ईदला जनावरांची वाहतूक करणे पडणार महागात

पुणे – जनावरांच्या वाहतूक करण्यावर आता अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन घ्यावा लागणार आहे. याचबरोबर वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना घेणे बंधनकारक आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) हे पाऊल उचलले आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांना केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल घ्यावा लागेल. याचबरोबर नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना घेणे बंधनकारक आहे.

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०, प्राण्यांच्या वाहतुकीचे नियम १९७८ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन वाहतूकदारांना करावे लागेल. हे पालन न केल्यास त्यांना जनावरांची वाहतूक करण्यात करता येणार नाही. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हटले आहे.

प्राण्यांचे वाहतुकीचे प्रमाणपत्रही गरजेचे

वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण अथवा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी आणि प्राणी कल्याण संस्था यांनी दिलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. असे प्रमाणपत्र नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!