अमृता फडणवीसांना ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी मोठे षडयंत्र
देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत मोठा खुलासा,धमकी प्रकरणाची इनसाईड स्टोरी
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच धमकीही देण्यात आली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. पण आता देवेंद्र फडवणीस यांनी मोठा खुलासा केल्याने परत खळबळ उडाली आहे.
फडणवीसांनी सभागृहात यावर खुलासा केला आहे. ते म्हणाले, अनिल जयसिंघानी नावाचा फरार व्यक्ती जो सात ते आठ वर्षे फरार असून त्याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झाले होते. जयसिंघांनीची उच्चशिक्षित मुलगी २०१५-१६ दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर तिने भेटणे बंद केले होते. २०२१ रोजी पुन्हा एकदा तिने अमृता फडणवीस यांना भेटण्यास सुरुवात केली. आपण स्वतः एक डिझायनर असल्याचे सांगत तिने अमृता फडणवीस बरोबर ओळख वाढवली.कालांतराने जयसिंघानींच्या मुलीने आपल्या वडिलांबद्दल अमृता यांना माहिती दिली. माझ्या वडिलांना चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यांमध्ये अडकविले आहे. त्यांना कृपया सोडवावे, अशी विनंती केली.तसेच अमृता फडणवीस यांना निवेदन देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर काही बुकींना आपण ओळख असल्याचंही या मुलीने सांगितलं. मागच्या काळात आम्ही बुकीची माहिती रेड टाकणाऱ्या अधिकाऱ्यांना देत होतो. त्यानंतर रेड पडल्यावर आम्हाला दोन्ही बाजूने पैसे मिळायचे. आपणही अशाच प्रकारे रेड कन्डक्ट करू, अशी ऑफर अमृता फडणवीस यांना देण्यात आली होती. हा प्रकार घडल्यावर अमृता फडणवीसांनी त्याला नकार दिला.आणि अशा कुठल्याही गोष्टींच्या व्यवहारांचा उल्लेख आपल्याशी करू नये, असा दम भरला. त्यानंतर अमृता फडणवीसांना एक व्हिडिओ पाठवत ब्लॅकमेल करण्यात आले त्यात सिंघानियांची मुलगी एका बॅगेत वस्तू भरत असतानाचा व्हीडिओ दाखवला. फडणवीसांच्या घरी काम करत असणाऱ्या एका महिलेकडे बॅग पोहोचवत असल्याचा हा व्हीडिओ होता. हे व्हीडिओ आम्ही जर का सोशल मीडियावर टाकले तर तुमचे पती अडचणीत येतील. माझे सर्वपक्षांशी संबंध आहेत. आम्हाला तत्काळ मदत करा, आमच्या सर्व केसेस घ्या, सिंघानियाला निर्दोष मुक्त करा अन्यथा आम्ही हे व्हीडिओ व्हायरल करू, अशा धमक्या देण्यात आल्या. असा धक्कादायक खुलासा फडणवीसांना केला आहे.
सर्व फूटेज फॉरेन्सिक चौकशीसाठी पाठविण्यात आले. तसेच हा संपूर्णपणे ब्लॅकमेलिंगचा प्रकार असल्याची नोंद पोलीसांनी केली आहे. ही संपूर्ण माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरारी आहे. पोलीस अधिक तपास सुरू आहे. त्या व्यक्तीचा सुगावा लागल्यानंतर बऱ्याच गोष्टी हाती लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.