
३० हजार शिक्षक भरतीत मोठा ‘झोल’? ४,८६० पदं अचानक गायब झाल्याने उमेदवारांचा संताप; ११ ऑगस्टपूर्वी मोठा निर्णय होणार?
महाराष्ट्रात सध्या ३० हजार २०९ पदांसाठी बहुप्रतिक्षित शिक्षक भरती प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू आहे. उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत पवित्र पोर्टलवर आपले पसंतीक्रम लॉक करण्याचे बंधन शिक्षण विभागाने घातले आहे. मात्र, या मेगा भरतीतच एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. शासनाने मंजूर केलेल्या क्रीडा शिक्षकांच्या तब्बल ४ हजार ८६० मंजूर पदांनाच पवित्र पोर्टलवरून थेट वगळण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे अनेक वर्षांपासून भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो B.P.Ed धारकांमध्ये आणि अभियोग्यता परीक्षा (TAIT) दिलेल्या उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाची लाट पसरली आहे.

जीआर (GR) निघूनही पदं झाली गायब!

मिळालेल्या माहितीनुसार, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या २ जानेवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार (GR) राज्यातील ४ हजार ८६० समूह साधन केंद्रांवर प्रत्येकी एक याप्रमाणे ‘केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (क्रीडा)’ पदांना मंजुरी देण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय आणि खासगी शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची हजारो पदे रिक्त असतानाही, चालू असलेल्या या मेगा भरतीमध्ये क्रीडा शिक्षकांचा एकही प्रवर्ग समाविष्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाचा हा भोंगळ कारभार नेमका कोणाच्या फायद्यासाठी? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

शिक्षक महासंघाचा थेट इशारा; काय आहेत मागण्या?
केंद्र आणि राज्य सरकार एकीकडे ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’च्या मोठ्या जाहिराती करत असताना, दुसरीकडे शाळांमधील क्रीडा शिक्षणालाच दुय्यम स्थान दिले जात असल्याची कडक टीका शिक्षक महासंघाने केली आहे.
शिक्षक महासंघाच्या मुख्य मागण्या
चालू असलेल्या पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेतच या सर्व ४,८६० क्रीडा शिक्षक पदांचा तातडीने समावेश करण्यात यावा. शिक्षण विभागाने क्रीडा शिक्षकांची पदे का वगळली, याचे स्पष्टीकरण तात्काळ द्यावे.शिक्षक महासंघाचे मुंबई व कोकण विभाग अध्यक्ष अनिल बोरनारे यांच्यासह सुभाष अंभोरे, विजय धनवडे आणि संपत गीते यांनी ही जोरदार मागणी लावून धरली आहे. आता ११ ऑगस्टच्या डेडलाइनपूर्वी शिक्षण विभाग यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

