मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
मानहानी प्रकरणी शिक्षेनंतर लोकसभा अध्यक्षांची कारवाई, काँग्रेसला झटका
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत. पण आज लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. देशातील कोणत्याही सक्षम न्यायालयाने कुणाही लोकप्रतिनिधीला किमान दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावल्यावर त्याचं संसद सदस्यत्व त्याचक्षणी रद्द होईल असा निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याचाच आधार घेऊन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील कोलार येथे एका सभेत राहुल गांधी म्हणाले होते की “सर्व चोरांचे आडनाव मोदी का आहे?” या वक्तव्यावरून बराच गदारोळ झाला होता. त्यानंतर भाजपचे आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पूर्णेश मोदी यांनी या टिप्पणीवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यावर काल न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती विशेष म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयाने दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर खासदारकीच्या रद्द करण्याचा निर्णय राहुल गांधी यांच्या आग्रहानंतरच युपीए सरकारच्या काळात संमत करण्यात आला होता. नियम ३५३ (२) नुसार एखादा खासदार केवळ लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीनुसारच संसदेतील एखाद्या सदस्यावर टिप्पणी करु शकतो. पण राहुल गांधींनी पंतप्रधानांवर टीका केल्यानं हा नियम मोडल्याचा आरोप आहे.
राहुल गांधी यांची आज त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. २०२४ ची निवडणुक ते लढवू शकणार नाहीत. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. दरम्यान शिक्षेविरोधात उच्च न्यायालायत अपील करण्यासाठी राहुल गांधी यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे.