
व्यवसायात भरभराटीचे आमिष दाखवून एका तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी स्वयंघोषित ‘भोंदू बाबा’ मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.कुर्डूवाडी येथील या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या दोघांना अटक करून माढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींच्या वतीने अॅड. सुभाष हल्याळकर यांनी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत, नोटीस देऊन अटक करणे अपेक्षित होते, असा युक्तिवाद केला. मात्र, सरकारी पक्षाचे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पुढील तपासासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने भोसले आणि वाघमारे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, या प्रकरणातील तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पुण्यातील मांजरी परिसरातून मनोहर भोसलेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरोधात कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे नोंद आहेत.भोसलेचा करमाळा तालुक्यातील घोटी येथे तब्बल २७ एकरात पसरलेला आलिशान आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे. दर अमावस्येला येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असे. बाबाला भेटण्यासाठी तब्बल ११ हजार रुपयांची फी आकारली जात असल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून अशा भोंदूगिरीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

मनोहर भोसले हा मूळचा इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावचा रहिवासी आहे. डीएड परीक्षेत अपयश आल्यानंतर तो आठवडी बाजारात सुके बोंबील विकून उदरनिर्वाह करत होता. काही वर्षांनंतर अचानक समोर येत त्याने स्वतःला संत बाळूमामांचा आशीर्वाद लाभलेला असल्याचा दावा केला आणि करमाळा तालुक्यातील उंदरगाव परिसरात मठ स्थापन केला. अमावस्या आणि पौर्णिमेला ‘साक्षात बाळूमामा येतात’ या दाव्यामुळे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ लागली. अनेक राजकीय नेते व कार्यकर्ते त्याच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे यापूर्वीही भोसलेवर विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या आरोपांपासून ते कर्करोग आणि मणक्याचे आजार बरे करण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी बारामती आणि दौंड येथे गुन्हे नोंद आहेत. २०२१ मध्ये तीन गुन्हे दाखल होऊनही त्याने भोंदूगिरी सुरूच ठेवली होती. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


