मोठी बातमी! या नेत्याची रद्द झालेली खासदारकी पुन्हा मिळाली
न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती, लोकसभा सचिवालयाकडून खासदारकी बहाल
दिल्ली दि २९(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेतल्यामुळे सध्या देशभरात त्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांची रद्द करण्यात आलेली खासदारकी त्यांना पुन्हा मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवंगत माजी कामगार मंत्री पीएम सय्यद यांच्या जावयाच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाल्यामुळे लक्षद्वीपचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. सालीह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कावरत्ती येथील सत्र न्यायालयाने खासदार फैजल यांना आणि इतर तिघांना १० वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यामुळे १३ जानेवारी २०२३ रोजी मोहम्मद फैजल यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र याप्रकरणी आता लोकसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व पुन्हा बहाल केले आहे. संसदेतील अपात्रेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी होण्याआधीच लोकसभा सचिवालयाने त्यांना लोकसभेचे सदस्यत्व बहाल केले असल्याची माहिती बार आणि बेंचने दिली आहे. फैजल यांच्या खासदारकीबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयातही सुनावणी झाली. यानंतर तात्काळ त्यांना लोकसभेने त्यांचे सदस्यत्व बहाल केले. आता हे प्रकरण राहुल गांधीं यांच्याशी जोडले जात आहे. महत्वाचे म्हणजे १३ जानेवारी रोजी लोकसभा सचिवालयाने अधिसूचना जारी करुन त्यांचे सदस्यत्व रद्द केले. यानंतर १८ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने लक्षद्वीपमधील पोटनिवडणुकीची घोषणा केली होती.
मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरातमधील एका न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी जाहीर केला. याला आव्हान देण्यासाठी गांधींकडे तीस दिवसाचा अवधी दिला आहे.