शिंदे फडणवीस सरकारकडून उद्धव ठाकरेंच्या सुरक्षेत मोठी कपात
शिंदेचा ठाकरेंना पुन्हा धक्का, कुटुंबाच्या सुरक्षेतही कपात, ठाकरेंना आता या दर्जाची सुरक्षा, राजकारण तापणार?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर आला आहे. अगोदर शिंदेनी आमदार खासदार फोडत ठाकरेंना धक्का दिला होता. पण आता शिंदे फडणवीस सरकारकडून ठाकरेंच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंसोबतच आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकारण होण्याची शक्यता आहे.
गृहमंत्रालयाकडून उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानक कपात करण्यात आली आहे. सुमारे ६० ते ७० पोलीस अधिकारी व कर्मचारी ठाकरे कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कार्यरत होते. मात्र, या सर्वांनाच पोलीस ठाण्यात रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच मातोश्रीवरील सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांची संख्येतही मोठी कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॉर्ट कार कमी करण्यात आली असून पायलट वाहनही कमी करण्यात आले आहे. मातोश्रीवरील एसआरपीएफची सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. मुंबईत उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान येथे विशेष सुरक्षा देण्यात आली होती. दरम्यान २०१८ मध्ये राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. याअगोदर त्यांना फक्त झेड क्षेणीतील सुरक्षा होती. गृह विभागाकडून अद्याप या सुरक्षेतील कपातीमागील कारण सांगण्यात आलेले नाही. यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. खासदार विनायक राऊत यांनी यावरून सरकारवर टिका केली आहे. तर नितेश राणे यांनी सरकारचे आभार मानले आहेत.